अर्णव गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच , राम कदमांचे जाहीर आव्हान

Arnab Goswami-Ram Kadam

मुंबई :  रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप नेते राम कदम यांनी तर थेट आव्हानच दिले आहे. अर्णव गोस्वामी (Arnab Goswami)यांना भेटण्यासाठी जेलमध्ये जाणारच, हिम्मत असेल तर अडवून दाखवा असा इशाराच कदम यांनी दिला आहे.

राम कदम (Ram Kadam) यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. आज सकाळी 11 वाजता मी तळोजा कारागृहात जाऊन अर्णव गोस्वामी यांची भेट घेणार असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे. देशातील 130 कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी अर्णव गोस्वामी यांना भेटायला जाणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कालच राम कदम हे अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी घाटकोपर ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायी चालत गेले होते. अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचे कदम यांनी म्हटले होते. तत्पूर्वी राम कदम यांनी अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी मंत्रालयाबाहेर उपोषण केले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर राम कदम यांना हे आंदोलन मागे घ्यावे लागले होते.

पोलिसांनी रविवारी सकाळी अर्णव गोस्वामी यांना अलिबागहून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात हलवण्यात आले होते. अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलिसांना चकमा देत एका व्यक्तीने अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती आहे. या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे समजते.

ही बातमी पण वाचा : अर्णव गोस्वामींच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करू; राम कदम यांचे सिद्धिविनायकाला साकडे 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER