अर्णब गोस्वामीने मला १२ हजार डॉलर्स आणि ४० लाख रुपये दिले – पार्थो दासगुप्ता

Partho Dasgupta
  • टीआरपी घोटाळा प्रकरणात पोलिसांना दिली माहिती

मुंबई : रिपब्लिक वाहिनीच्या बाजूने रेटिंगमध्ये फेरफार करण्यासाठी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीकडून मला १२ हजार डॉलर मिळाले होते. याशिवाय, दोन विशेष सुट्यांसह तीन वर्षांमध्ये एकूण ४० लाख रुपये मिळाले, अशी माहिती टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रीसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना लेखी जबाबात दिली. या प्रकरणात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात माहिती देण्यात आली आहे.

३ हजार ६०० पानांचे हे पुरवणी आरोपपत्र मुंबई पोलिसांकडून ११ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले आहे. त्यात बार्क फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचा, दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअप चॅट आणि बार्कचे माजी कर्मचारी आणि केबल ऑपरेटरसह ५९ जणांचे जबाब आहेत. ऑडिट रिपोर्टमध्ये अनेक न्यूज चॅनल, रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ आणि आजतकसाठी बार्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे कथित टीआरपी फेरफार आणि रेटिंगच्या फिक्सिंगबाबत माहिती आहे. पार्थो दासगुप्ता, रोमील रामगढिया, विकास खनचंदानी यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सर्वांत अगोदर १२ लोकांविरोधात नोव्हेंबरमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या आरोपपत्रानुसार दासगुप्ताचे म्हणणे क्राईम इंटेलिजन्स युनिटने ९ नोव्हेंबर रोजी रेकॉर्ड केले होते.

दासगुप्ताने म्हटले आहे की, मी अर्णब गोस्वामीला २००४ पासून ओळखतो. आम्ही ‘टाइम्स नाऊ’मध्ये सोबत काम करत होतो. मी बार्कचा सीईओ म्हणून २०१३ मध्ये काम सुरू केले होते आणि अर्णब गोस्वामीने २०१७ मध्ये रिपब्लिक चॅनल सुरू केले होते. रिपब्लिक चॅनल सुरू करण्याआधी त्याने अनेकदा माझ्याशी योजनेबाबत चर्चा केली होती व रेटिंगसाठी मदत करण्यास सांगितले होते. टीआरपी वाढविण्यासाठी बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा गुन्हे शाखेने मागच्या महिन्यात न्यायालयात केला होता. पोलिसांना दिलेल्या जबाबात दासगुप्ता म्हणतात, रिपब्लिक टीव्हीला क्रमांक-१ चे रेटिंग मिळावी, यासाठी मी आपल्या टीमसोबत काम करायचो व टीआरपीमध्ये फेरफार करायचो.

हे जवळपास २०१७ पासून २०१९ पर्यंत सुरू होते. २०१७ मध्ये अर्णब गोस्वामीने मला माझ्या कुटंबासोबतच्या फ्रान्स व स्वित्झर्लंडच्या सहलीसाठी जवळपास सहा  हजार डॉलर रोख दिले. यानंतर २०१९ मध्येदेखील त्यांनी मला तेवढीच रक्कम दिली. २०१७ मध्येदेखील गोस्वामीने माझी भेट घेतली आणि मला २० लाख रुपये रोख दिलेत. २०१८ व २०१९ मध्ये त्यांनी मला प्रत्येक वेळी १० लाख रुपये दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER