अर्जुन-परिणीतीचा ‘संदीप और पिंकी फरार’ 19 मार्चला रिलीज होणार

Sandeep and Pinky Farar

दोन-तीन वर्षांपूर्वी नवा सिनेमा रिलीज होणार असेल तर त्याची पब्लिसिटी दीड दोन महिने आधी सुरु केली जात असे. पण आता कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीमुळे निर्मात्यांना पब्लिसिटीवर वेळ घालवणे परवडत नाही. याचे कारण या वर्षी अनेक सिनेमे रिलीज होणार असून सगळ्या मोठ्या नायकांनी बॉक्स ऑफिस बुक करून ठेवले आहे. त्यामुळे ज्या तारखा मिळतील त्या तारखांना निर्माता आपला सिनेमा रिलीज करू लागला आहे. याला अगदी यशराजसारखे बॅनरही अपवाद नाही. यामुळेच यशराजने अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांचा ‘संदीप और पिंकी फरार’चा (Sandeep and Pinky Farar) पहिला ट्रेलर आज रिलीज केला जाणार असून सिनेमाही 19 मार्चला रिलीज केला जाणार आहे.

‘संदीप आणि पिंकी फरार’चे दिग्दर्शन दिवाकर बॅनर्जीने केले आहे. अर्जुन आणि परिणीति चोप्राचा हा एकत्र असलेला तीसरा सिनेमा आहे. 2012 मध्ये या दोघांनी इश्क़जादे सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर या दोघांनी 2018 मध्ये नमस्ते इंग्लंडमध्ये एकत्र काम केले होते.

‘संदीप और पिंकी फरार’ हा एक ब्लॅक कॉमेडी जॉनरचा सिनेमा आहे. यात अर्जुन कपूर हरियाणातील पोलीस अधिकारी बनला असून परिणीति एका मोठ्या कंपनीतील अधिकारी बनली आहे. खरे तर हा सिनेमा गेल्या वर्षी 20 मार्च 2020 ला रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि सिनेमाचे रिलीज रखडले. यशराज हा सिनेमा एप्रिल मेच्या सुट्ट्या डोळ्यासमोर ठेऊन रिलीज करणार होते. पण तारखा नसल्याने त्यांनी आता तातडीने सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमानंतर लगेचच पुढच्या आठवड्यात म्हणजे 26 मार्चला परिणीतीचा प्रख्यात बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित ‘सायना’ हा सिनेमाही रिलीज होणार आहे. ‘संदीप और पिंकी फरार’सोबत जॉन अब्राहमचा (John Abraham) संजय गुप्ता निर्मित-दिग्दर्शित ‘मुंबई सागा’ही रिलीज होणार आहे. ‘मुंबई सागा’चे पारडे वरचढ असल्याने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष करामत करणार नाही असे बॉलिवूडमध्ये म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER