अर्जुनला पार करायचाय अपेक्षा व तुलनेचा उंचच उंच डोंगर!

Arjun Tendulkar

अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) अतिशय खडतर प्रवासाला निघालाय. या नावाला अजुन स्वतःची ओळख नसली तरी अर्जुन नाही पण तेंडूलकर नावाचा महिमा एवढा मोठा आहे की समस्त भारतीय त्याला ओळखतात. या माउंट एव्हरेस्टएवढ्या (Mount Everest) उंचीच्या नावाच्या सावलीतच त्याला वाटचाल करायची आहे म्हणूनच त्याचा प्रवास फार कठीण राहणार आहे. या सावलीतून बाहेर येत आपली स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी त्याला मैदानावर तर चमकायचे आहे, पण सततची तुलना आणि वाढलेल्या अपेक्षा यावरही मात करायची आहे. या दुहेरी ओझ्याखाली दबलेली रोहन गावसकर (Rohan Gavaskar) , स्ट्युअर्ट बिन्नी (Stuart Binny) सारखी उदाहरणं आहेत पण वटवृक्षाच्या सावलीतून बाहृर आलेली मोहिंदर अमरनाथ (Mohinder Amarnath) व संजय मांजरेकरसारखी (Sanjay Manjrekar) उदाहरणेसुध्दा आहेत. या नंतरच्या नावांच्या वाटेवर अर्जुनला वाटचाल करायची आहे पण या दोघांच्या तुलनेत अर्जुनला जो डोंगर पार करायचा आहे तो फार फार उंच आहे म्हणूनच त्याची वाट अधिक कठीण आहे.

त्याची झलक त्याला बघायलासुध्दा मिळालेली आहे. अमुक अमूक बापाचा मुलगा म्हणून त्याला निवडले आणि इतरांना डावलले अशा चर्चा झालेल्या आहेत. अशात मुंबईच्या सिनियर संघात त्याने आपला प्रवास सुरु केला आहे आणि सुरुवात समाधानकारक झाली आहे. आपल्या गगनचुंबी कर्तृत्वाच्या वडिलांच्या वाटेपेक्षा वेगळी वाट अर्जुनने पकडली आहे. त्याने बॕटीपेक्षा चेंडूला अधिक जवळ केलेय आणि गोलंदाज म्हणून त्याने पदार्पणात यशसुध्दा मिळवलेय.

सैयद मुश्ताक अली ट्राॕफी टी-20 स्पर्धेच्या सामन्यात त्याने हरियाणाच्या चैतन्य बिश्नोई याला चार धावांवर बाद करुन अष्टपैलू गोलंदाज म्हणून आपला प्रवास सुरु केला आहे.

योगायोगाने चेन्नई सुपर किंग्जच्या तंबूत 2018 व 2019 मध्ये राहिलेल्या चैतन्यची पार्श्वभूमीसुध्दा अर्जुनसारखीच मोठ्या घराण्याची आहे. हरियाणाचे तीन वेळचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा तो नातू आहे.

मघाशी म्हटले त्याप्रमाणे अर्जुनची तुलना होणे अपरिहार्य आहे. अजुन पहिलाच सामना खेळलाय पण तुलना सुरु झालीय. म्हणे ग्रेट सचिन आपला शेवटचा सामना हरियाणाविरुध्दच खेळले होते आणि मुलगा हरियाणाविरुध्द पदार्पण करतोय. अर्जुन 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला तर त्याचे वडील म्हणजे सचिन तेंडूलकर यांनी आपल्या 96 टी-20 सामन्यात कधी पाचव्या क्रमांकाच्या खाली फलंदाजी केली नाही. अर्थात तेंडूलकर नाव आणि विक्रमांची जी अतुट सांगड जुळलीय ती नव्या पिढीच्या आगमनासोबतही कायम राहिलीय. सचिन व अर्जुन हे तेंडूलकर पितापूत्र स्पर्धात्मक टी-20 क्रिकेट खेळलेले पहिले भारतीय बापबेटे क्रिकेटपटू ठरले आहेत.

ही तर सुरुवात आहे. पदोपदी अर्जुनला अशा तुलनेचा सामना करावा लागणार आहे. त्यात तो कितपत यशस्वी ठरतो आणि स्वतःचे कसे अस्तित्व निर्माण करतो हे काळच ठरवेल पण आपण क्रिकेटप्रेमींनीही अशी तुलना करणे टाळले तर एक कारकिर्द बहरु शकते याची काळजी आपणसुध्दा घ्यायला हवी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER