दिल्ली ’बाटला हाऊस’ चकमक प्रकरणात अरिझ खानला फाशी

Ariz Khan - Hanged - Maharastra Today
  • मयत पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबास १० लाख भरपाई

नवी दिल्ली :- सप्टेंबर २००८ मध्ये नवी दिल्लीत ‘बाटला हाऊस’ या इमारतीत पोलीस आणि अतिरेकी यांच्याात झालेल्या सशस्त्र चकमकीशी संबंधीत खटल्यात येथील सत्र न्यायालयाने ‘इडियन मिजाहिदीन‘ या दहशतवादी संघटनेचा हस्तक अरिझ खान ऊर्फ जुनैद याला फाशीची शिक्षा ठोठावली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी हा निकाल जाहीर केला. अरिझ खान यास भारतीय दंड विधानाच्या १८६, ३३३, ३५३, ३०२, ३०७, १७४ ए व ३४ तसेच शस्त्र कायद्याच्या कलम २७ अन्वये  गेल्या सोमवारी दोषी ठरविले गेले होते. हे प्रकरण ‘विरळात विरळा’ या वर्गात मोडणारे असल्याने आरोपीला खुनाच्या शिक्षेबद्दल फाशी देणेच योग्य आहे, असे न्यायाधीश यादव यांनी नमूद केले.

दि.१९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या या चकमकीत दिल्ली पोलीस दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा मरण पावले होते. न्यायाधीश यादव यांनी जुनैदला विविध गुन्ह्यांसाठी मिळून एकूण ११ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तो वसूल झाल्यावर त्यातील १० लाख रुपये निरीक्षक शर्मा यांच्या कुटुंबियांस भरपाई म्हणून द्यावी, असाही आदेश दिला गेला. या चकमकीत बलवंत सिंग व राजवीर सिंग हे दोन पोलीस शिपाई जखमी झाले होते. पोलिसांच्या गोळीबारात आतीफ अमीन व मोहम्मद साजीद हे ‘मुजाहिदीन’चे दोन अतिरेकी ठार झाले होते.

या चकमकीच्या सहा दिवस आधी दिल्लीत कॅनॉट प्लेस, करोल बाग, ग्रेटर कैलाश आणि इंडिया गेट अशा पाच ठिकाणी ओळीने बॉम्बस्फोट झाले होते. ते बॉम्बस्फोट करणारे अतिरेकी बाटला हाऊसमधील एका फ्लॅटमध्ये लपले आहेत, अशी पक्की खबर मिळाल्याने पोलीस पथक तेथे गेले असता ही सशस्त्र चकमक झाली होती. चकमकीच्या वेळी अरिझ खान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. नंतर सन २०१८मध्ये उत्तराखंडमधील नेपाळ सीमेवरील बनबासा येथून त्याला अटक केली गेली होती.

याच खटल्यात सत्र न्यायालयाने शहजाद अहमद या ‘इंडियन मुजाहिदीन’च्या आणखी एका हस्तकास जन्मठेम ठोठावली होती. तेव्हा दुसरा आरोपी अरिझ खान फरार होता. त्याच्यावर अटकेनंतर स्वतंत्रपणे खटला चालला व त्याचा निकाल आता लागला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER