‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणात अरिझ खान दोषी

Session Court-Aziz Khan-Batla House
  • दोषी ठरलेला ‘इंडियन मुजाहिदीन’चा दुसरा हस्तक

नवी दिल्ली : सप्टेंबर २००८ मध्ये नवी दिल्लीत ‘बाटला हाऊस’ या इमारतीत पोलीस आणि अतिरेकी यंच्यात झालेल्या सशस्त्र चकमकीशी संबंधीत खटल्यात सत्र न्यायालयाने सोमवारी ‘इडियन मिजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा हस्तक अरिझ खान ऊर्फ जुनैद याला दोषी ठरविले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी हा निकाल जाहीर केला. अरिझ खान यास भारतीय दंड विधानाच्या १८६, ३३३, ३५३, ३०२, ३०७, १७४ ए व ३४ तसेच शस्त्र कायद्याच्या कलम २७ अन्वये दोषी ठरविले गेले. सिद्ध झालेल्या गुन्ह्यांसाठी आरोपीला नंतर शिक्षा सुनावली जाईल. या चकमकीत पोलीस दलाचे जे कर्मचारी मृत व जखमी झाले त्यांना भरपाई देण्याच्या दृष्टीने आरोपी अरिझ खान व त्याच्या कुटुंबाची आर्थिक कुवत किती आहे याची माहिती काढून ती तपासी अधिकाºयांनी सादर करावी, असाही आदेश न्यायालयाने दिला.

१९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या या चकमकीत दिल्ली पोलीस दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा मरण पावले होते तर बवंत सिंग व राजवीर सिंग हे दोन पोलीस शिपाई जखमी झाले होते. पोलिसांच्या गोळीबारात आतीफ अमीन व मोहम्मद साजीद हे ‘मुजाहिदीन’चे दोन अतिरेकी ठार झाले होते. त्याच्या सहा दिवस आधी दिल्लीत कॅनॉट प्लेस, करोल बाग, ग्रेटर कैलाश आणि इंडिया गेट अशा पाच ठिकाणी ओळीने बॉम्बस्फोट झाले होते.

ते बॉम्बस्फोट करणारे अतिरेकी बाटला हाऊसमधील एका फ्लॅटमध्ये लपले आहेत, अशी पक्की खबर मिळाल्याने पोलीस पथक तेथे गेले असता ही सशस्त्र चकमक झाली होती. चकमकीच्या वेळी अरिझ खान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. नंतर सन २०१८मध्ये उत्तराखंडमधील नेपाळ सीमेवरील बनबासा येथून त्याला अटक केली गेली होती. याच खटल्यात सत्र न्यायालयाने शहजाद अहमद या ‘इंडियन मुजाहिदीन’च्या आणखी एका हस्तकास जन्मठेम ठोठावली होती. तेव्हा दुसरा आरोपी अरिझ खान फरार होता. त्याच्यावर अटकेनंतर स्वतंत्रपणे खटला चालला व त्याचा निकाल आता लागला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER