पंजाबमधील शेतकरी पाकिस्तानचा आहे का? आझाद मैदानावरुन पवारांचा केंद्रावर घणाघात

Sharad Pawar

मुंबई : मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात केवळ पंजाब, हरियाणाचे शेतकरी असल्याचं सांगण्यात येतं. त्यांच्या आंदोलनाला कोणाचाही पाठिंबा नसल्याचं सांगितलं जात. पंजाबचा शेतकरी हा काय पाकिस्तानचा आहे का? पंजाबचा शेतकरी म्हणजे काय साधा आहे का? असा संतप्त प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदी सरकारला केला. पंजाब, हरियाणाचा शेतकरी मागील दोन महिन्यांपासून रस्त्यावर बसून शांततामय मार्गाने आंदोलन करत आहे. पण सरकार नाकर्तेपणाची भूमिका घेत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी मी आंदोलनाला पाठिंबा देत आहो, असं पवार यांनी शेतकऱ्यांच्या मोर्च्याला संबोधित करताना स्पष्ट केलं. .

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. शरद पवार यांनी आज आंदोलनाला भेट देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शेतकरी नेते अजित नवले, शेकाप नेते जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सपा नेते अबू आजमी, अशोक ढवळे, माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड उपस्थित होते. यावेळी पवारांच्या हस्ते शेतकरी आंदोलकांसाठी अन्न पुरवठा करणाऱ्या शीख बांधवांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शरद पवारांनी आझाद मैदानातून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार प्रहार केला. ही लढाई केवळ शेतकऱ्यांची नाही. ही आपल्या सर्वांची लढाई आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना शेतकऱ्यांबाबत कवडीचीही अस्था नाही. 60 दिवस झाले शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसला आहे. पण देशाच्या पंतप्रधानांनी या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले का? असा सवाल पवार यांनी केला. दिल्लीत आंदोलन करणारा शेतकरी हा पंजाब आणि हरियाणातील असल्याचं सांगितलं जात आहे. पंजाबचा शेतकरी असला म्हणून काय झालं? पंजाबचा शेतकरी पाकिस्तानी आहे काय? असा संतप्त सवालही त्यांनी केला. स्वातंत्र्याच्या काळात याच पंजाबच्या शेतकऱ्याने जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण केलं. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्यातही पंजाबच्या शेतकऱ्यांनी जीव देण्यास मागेपुढे बघितले नाही. अर्ध्या देशाला अन्न पुरवणारा हा बळीराजा आहे. पण सरकार नाकर्तेपणाची भूमिका घेत आहे, अशी टीका त्यांनी केली.

या सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा आणला. जो शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करतो, त्याला जनता उद्ध्वस्त केल्यासिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आधी कायदा रद्द करा आणि मग चर्चा करा. आमचीही चर्चेची तयारी आहे. पण शेतकऱ्यांचे हमी भावाशी संबंधित जे प्रश्न आहे, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मोर्चानंतर राज्यपालांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचं मला सांगण्यात आलं. पण मी महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल पाहिला नाही. या राज्यपालांना कंगनाला भेटण्यासाठी वेळ आहे, पण बळीराजाला भेटायला वेळ नाही. शेतकऱ्यांचं आंदोलन होतं याची माहिती राज्यपालांना होती. त्यामुळे त्यांनी राजभवनात थांबायला हवं होतं. पण तेवढं धैर्य त्यांनी दाखवलं नाही. ते गोव्यात गेले. पण शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी त्यांना वेळ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER