अरबाझ खान ‘रिटर्न तिकीट’मध्ये बलात्कार पीडितेला न्याय देणाऱ्याची करणार भूमिका

भाऊ सलमानप्रमाणे अरबाझ खानने (Arbaaz Khan) नायक बनण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो यशस्वी झाला नाही. नंतर त्याने सलमान घेऊन सिनेमाची निर्मिती केली आणि त्यात यश मिळवले. सलमानला (Salman khan) एका वेगळ्या रुपात सादर करण्यासाठी अरबाझने ‘दबंग’ची निर्मिती केली होती. हा सिनेमा सुपरहिट तर झालाच याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर अरबाझने दबंगची सीरीज तयार केली. मात्र त्याचा सोनम कपूरला घेऊन तयार केलेला ‘डॉली की डोली’ मात्र सुपरप्लॉप झाला होता. सिनेमांची निर्मिती करीत असतानाच अरबाझने काही सिनेमांमध्ये दुय्यम भूमिकाही साकारल्या. मात्र यावर्षी अरबाझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या नव्या सिनेमाची दोन दिवसांपूर्वी घोषणा झाली असून यात तो एका बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

अरबाझ खानच्या या सिनेमाचे नाव ‘रिटर्न टिकट- आफ्टर थर्टी ईयर’ (Return Ticket) असे ठेवण्यात आलेले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन निशांत जीके रंजन करणार आहे. या सिनेमाचे शूटिंग फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. यात अरबाझसोबत गुरलीन चोप्रा, देव शर्मा, श्वेता तिवारी, अध्ययन सुमन, मुग्धा गोडसे, आसिफ तांबे, अमित जे शर्मा, नीलम गुप्ता, रसलान मुमताज, असीमा भट्ट, राजकपूर साही, अश्विनी, पंकज झा, विक्रम गोखले अशी कलाकारांची फौज दिसणार आहे. या सिनेमाची कथा लिहिली आहे प्रत्युश द्विवेदीने आणि याची निर्मिती करीत आहे ओम श्री एंटरटेनमेंट आणि रियालिटी, शीष चित्र एंटरटेनमेंट आणि निशांत वुड. यावर्षी मोठ्या सिनेमांची गर्दी असल्याने हा सिनेमा कदाचित ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रिलीज केला जाऊ शकेल असे म्हटले जात आहे. तसे झाले तर अरबाझचे या सिनेमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण होईल.

अरबाझने या सिनेमाबाबत बोलताना सांगितले, मला जेव्हा निशांतने सिनेमाची स्टोरी सांगितली, तेव्हा ती ऐकून आपण सिनेमात काम करावे असे मला वाटले. आपण बलात्काराच्या अनेक घटना ऐकतो, वाचतो. त्यात बलात्कार पीडितेला न्याय मिळतोच असे नाही. त्यामुळे सिनेमात का होईना बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्याचे काम करू शकतो आणि समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करू शकतो असे वाटल्याने मी या सिनेमाला होकार दिला असेही अरबाझने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER