कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा; पंतप्रधान मोदींचे स्वामी अवधेशानंद गिरी यांना फोन करुन आवाहन

PM Modi - Swami Awadheshanand Giri - Maharastra Today
PM Modi - Swami Awadheshanand Giri - Maharastra Today

नवी दिल्ली : देशात करोनाचं संकट गंभीर झालेलं असतानाच्या काळात उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे. कुंभमेळ्यात झालेल्या लाखो भाविकांच्या गर्दीमुळे हजारो जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. अनेक साधु-संतांसह भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. काही आखाड्यांनी कुंभमेळ्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला आहे. तर कुंभमेळ्यामुळे निर्माण झालेल्या संसर्गाच्या संकटाची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी मोदींनी कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली.

मोदी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत म्हणाले की, ‘मी आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी (Swami Awadheshananda Giri) यांच्याशी फोनवरून चर्चा केली.सर्व संतांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत. याबद्दल मी संतांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर मी विनंती केली की, दोन शाही स्नान झाले आहेत आणि करोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा. यामुळे संकटाशी लढण्याला ताकद मिळेल,’ असं आवाहन मोदींनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाबाबत प्रतिक्रिया देताना महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांनीही ट्विट केलं आहे. ‘पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. जीवनाची रक्षा करणं मोठं पुण्य आहे. माझा जनतेला आग्रह आहे की, करोना परिस्थिती बघता मोठ्या संख्येनं स्नान करण्यासाठी येऊ नये. त्याचबरोबर नियमांचं पालन करावं,’ असं स्वामी अवधेशानंद यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button