आरेमधील ३२८ हेक्टर क्षेत्र ‘संरक्षित वन’ करण्यास मंजुरी

Aaditya Thackeray

मुंबई :- आरे वसाहतीतील दाट जंगल असलेले  गोरेगावमधील ३२८.९८  हेक्टरचे क्षेत्र वन कायद्यानुसार ‘संरक्षित वन’ (Protected Forest) म्हणून घोषित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी २८८.४३ हेक्टर क्षेत्र पशुधन विकास खात्याच्या तर ४०.४६ हेक्टर क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आहे.

वन कायद्यानुसार हे वनक्षेत्र ‘संरक्षित वन’ म्हणून घोषित करण्यासाठीची प्राथमिक अधिसूचना येत्या काही दिवसांत काढली जाईल. त्यावर लोकांकडून हरकती व सूचना मागविल्यानंतर अंतिम अधिसूचना निघेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे संरक्षित वनक्षेत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात समाविष्ट केले जाईल. परिणामी या उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ १०६ चौ. किमी एवढे होईल.

आरे  वसाहतीमधील गर्द वनराईचा हा पट्टा प्रदूषणाने जीव गुदमरणाऱ्या मुंबई शहराची सुखदायी ‘हरित फुफ्फुसे’ (Green Lungs ) मानली जातात. नव्या क्षेत्राची भर पडल्यानंतर  आरे वसाहतीमधील २५.५ टक्के क्षेत्र ‘संरक्षित वन’ या सदरात गणले जाईल.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की, आरेमधील दाट जंगल असलेला सर्व भाग ‘संरक्षित वन’ होईल, याची काळजी हा निर्णय घेताना घेण्यात आली आहे. मात्र सध्याचे सर्व रस्ते,  बांधकामे, म्हशींचे गोठे व प्रस्तावित विकासकामांसाठी लागणारी जागा यातून वगळ्यात आली आहे. तसेच या जंगलपट्ट्याखेरीज आरेमध्ये जो गवताळ प्रदेश आहे तो आताप्रमाणेच यापुढेही ‘ना विकास क्षेत्र’ (No Development Zone)  म्हणूनच कायम राहील. आरेमध्ये पूर्वापार राहणार्‍या आदिवासींच्या हिताचीही काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरेमध्ये जेव्हा जेव्हा विकासकामे काढली जातात तेव्हा जंगलतोड होईल म्हणून पर्यावरणवादी त्यास विरोध करतात. प्रकरणे न्यायालयात जातात. मेट्रो रेल्वेची कारशेड तेथे बांधण्यास स्वत: आदित्य ठाकरे यांनीही मंत्री होण्याआधी विरोध केला होता. त्यामुळे हे वाद कायमचे मिटविण्यासाठी आरेमधील ज्या भागात अजूनही बर्‍यापैकी जंगले आहेत ती  ‘संरक्षित वन’ म्हणून घोषित करण्याची मागणी यातूनच पुढे आली. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २ सप्टेंबर रोजी संबंधितांना दिले होते.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानाच्या शर्यतीत दिसणार? राष्ट्रीय राजकारणासाठी आदित्यवर मोठी जबाबदारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER