कन्हैयाकुमारवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास केजरीवाल सरकारची मंजुरी

Arvind Kejriwal-Kanhaiya Kumar

नवी दिल्ली : जेएनयू छात्र संघाचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैयाकुमारविरोधात आता देशद्रोहाचा खटला चालणार आहे. २०१६ मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कथित देशविरोधी नारे दिल्याप्रकरणी हा खटला कन्हैयाकुमारविरोधात चालणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनं देशद्रोहाच्या प्रकरणात कन्हैयाकुमार, उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजुरी दिली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात कुमारसह अन्य दोघांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयूच्या कॅम्पसमध्ये घोषणाबाजी केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी कन्हैयाकुमारच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला होता. जेएनयू कथित देशविरोधी घोषणा प्रकरणी तीन वर्षांनंतर कन्हैयाकुमार आणि उमर खालिदसह १० जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचं कलम लावण्यात आलं आहे. तब्बल १२५० पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे. कन्हैयाकुमार याने सध्या केंद्रातील सरकार आणि नरेंद्र मोदींविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तो नेहमी भाजप आणि संघाविरोधात भूमिका मांडत असतो.

दरम्यान, याबाबत कन्हैयाकुमार यांनी ट्विट केलं आहे. ‘देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी मंजुरी दिल्याबद्दल दिल्ली सरकारचे आभार. दिल्ली पोलीस आणि सरकारी वकिलांनी आता हा खटला गांभीर्याने घ्यावा, अशी त्यांना विनंती. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी आणि या प्रकरणाचा न्यायालयातच न्याय व्हावा. देशद्रोहाच्या या खटल्याची जलदगती न्यायालयात सुनावणी करून तत्काळ कारवाई करावी. या प्रकरणात राजकीय फायद्यासाठी देशद्रोहासारख्या कायद्याचा कसा दुरुपयोग होत आहे हे यातून सिद्ध होईल. तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी कसे प्रयत्न होतात हेही यातून स्पष्ट होईल, सत्यमेव जयते.’ असंही कन्हैयाकुमार यांनी नमूद केलं आहे.