राज्यपालांकडून चार जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक

Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : राज्यातील गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद व वाशिम या ४ आकांक्षित जिल्ह्यांनी २०१८ च्या तुलनेत मानव निर्देशांकात उत्तम प्रगती करत आपले एकूण मानांकन (रॅंकिंग) सुधारल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी समाधान व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुकही केले आहे.

विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेताना राज्यपालांनी सर्व आकांक्षित जिल्ह्यांना वर्ग ३ ची पदे तातडीने भरण्याचे निर्देश यावेळी दिले. वर्ग ३ ची पदे रिक्त राहिली तर त्याचा विविध सेवांवर, विशेषतः आरोग्यसेवा क्षेत्रावर विपरीत परिणाम होतो असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करावे, आपणही त्यात लक्ष घालू असे राज्यपालांनी सांगितले. राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी राज्यपालांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून जिल्ह्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या प्रगतीचा अहवाल राष्ट्रपतींना नियमितपणे सादर करावा लागतो. याकरिता राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांची प्रगती जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषि व जलसंसाधन, आर्थिक समावेशन व कौशल्य विकास तसेच पायाभूत सुविधा या निदेशांकांवर आकांक्षित जिल्ह्याने काय प्रगती केली याची विस्तृत माहिती राज्यपालांनी यावेळी घेतली. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुखराजन यांनी यावेळी विविध क्षेत्रातील जिल्ह्यांच्या प्रगतीची माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER