दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी स्वयंसेवकांची नेमणूक : जिल्हाधिकारी

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग, अपंग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा व विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १२ हजार ८७ दिव्यांग मतदार असून त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हेल्प लाईनसह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये विशेषत्वाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसह व वृध्द मतदारांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. निवडणूक विभागाने राबवलेल्या विशेष नोंदणी अभियानात महिन्याभरातच नागपुरात ८०५६ इतक्या नवीन मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे नागपूरची मतदार संख्या आता ४१,७१,४२० इतकी झाली आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, एखादी व्यक्ती जर अंध किंवा एखाद्या तीव्र शारीरिक व्याधींनी ग्रस्त असेल आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील चिन्ह ओळखण्यास सक्षम नसेल, अशा परिस्थितीत मतदान अधिकाऱ्याच्या परवानगीने सहायक मदत करु शकतो. नागपूर जिल्ह्यात सध्या १२ हजार ८७ दिव्यांग व्यक्तींची नोंद मतदार यादीमध्ये करण्यात आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे आणि ऑनलाईन अ‍ॅपद्वारे नोंदणी झाली आहे.

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदान केंद्रात जाण्यासाठी रॅम्प, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.अशा व्यक्तींना रांगेत प्रतीक्षेत न राहता मतदान करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. यासोबतच मतदान केंदावर कायमस्वरुपी किंवा संपूर्ण सुविधा, ब्रेल लिपितील मतदार स्लिप, डमी मतदान पत्र (बॅलेट पेपर), मॅग्नीफाईंग ग्लास, मॅग्नीफाईंग शिट इत्यादी साहित्य, दर्शक संकेत चिन्ह, मार्गदर्शन व साहाय्य करण्यासाठी विशेष शिक्षक, अपंग शाळेतील कर्मचारी, शासकीय वाहनाने दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सुविधाही उपलब्ध राहणार आहे.

पत्रपरिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आदी उपस्थित होते.