नियुक्त आमदार : उर्मिला मातोंडकरचे नाव चर्चेत, काँग्रेसमध्ये ९ नाव आघाडीवर

Urmila Matondkar

मुंबई : विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या जागा महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच भरल्या जाणार आहेत. यासाठी काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे नेत्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. काँग्रेसच्या वाट्याला ४ आल्या आहेत आणि नऊ नेते इच्छूक असल्याचे समजते. यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव आघाडीवर आहे, असे कळते. काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवलेली होती. हारल्या. निवडणुकीनंतर उर्मिला मातोंडकर यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. आता राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठी अचानक त्यांचे नाव चर्चेत आल्याने काँग्रेसच्या गोटात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विदर्भातून एक मुस्लिम चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे समजते. राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठी काँग्रेसकडून चर्चेत असलेली नावे अशी – उर्मिला मातोंडकर, सत्यजित तांबे, सुरेश शेट्टी, सचिन सावंत, राजू वाघमारे, नसीम खान, मोहन जोशी, बाबा सिद्दिकी आणि रजनी पाटील.

राज्यपालनियुक्त सदस्यासाठी निकष

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. राजकीयदृष्ट्या सोय पाहता अनेकदा हे निकष बाजूला ठेवले जातात. मात्र, कधी कधी राज्यपाल हे निकष पूर्ण करण्याचा आग्रह धरतात. अशा वेळी राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष होऊ शकतो.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवेळी महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात संघर्ष झाला होता. सध्याच्या १२ जागाही जून महिन्यात भरल्या जाणे अपेक्षित होते. मात्र, राज्यपालांनी कोरोना परिस्थितीचे कारण देत या नियुक्त्या पुढे ढकलल्या होत्या. यावेळी महाविकासआघाडीने १२ जागा भरायच्याच, असा चंग बांधला आहे. त्यामुळे राज्यपालांनी त्याला नकार दिल्यास पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER