कोल्हापूर महापालिकेवर प्रशासक नियुक्त

Kadambari Balkawade - Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : महापालिका सभागृहाची मुदत १५नोव्हेंबरला संपत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे ( Kadambari Balkawade) यांची निवडणुका होईपर्यंत महापालिकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. १६ नोव्हेंबरपासून आयुक्‍त डॉ. कादंबरी बलकवडे प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (2) महेश पाठक यांनी त्यासंदर्भातील आदेश काढला आहे. यापुढे किमान सहा महिने प्रशासकांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार सुरू राहणार आहे.

महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरला संपणार आहे. मात्र, कोरोनाच्या (Corona) पार्श्‍वभूमीवर निवडणूक घेता येत नाही. त्यामुळे प्रशासक नियुक्‍ती केली आहे.

यासंबंधीच्या आदेशात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपणार्‍या स्थानिक संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या. निवडणूक आयोगाने नोव्हेंबर-2020 मध्ये मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याचे कळविले आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम, 1949 मधील कलम 6.6 (अ) मधील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे ही मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे अधिनियमातील तरतुदीनुसार मुदत संपत असलेल्या कोल्हापूर महापालिकेत प्रशासक म्हणून महापालिका आयुक्‍तांची नियुक्‍ती करण्यात येत आहे. आयुक्‍तांनी महापालिकेची मुदत संपताच प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारून अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER