
भूक न लागणे किंवा जेवण करण्याची इच्छा न होणे हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते. कधी कधी आजारातून बरे झाल्यावर देखील जीभेला चव नसते. एखादेवेळी जेवणाची इच्छा होत नाही. अशा वेळी आहारात बदल करणे आवश्यक ठरते. आहारात काही क्षुधावर्धक म्हणजेच भूक वाढविणाऱ्या पाककृतींचा समावेश केल्यास पोषण व चिकित्सा दोन्ही गोष्टी साध्य होतात. बघूया अशाच काही पाककृती !
क्षुधावर्धक ताक – ताक पाचनक्रिया चांगले करते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहेच. परंतु क्षुधावर्धनाकरीता यात काही बदल करता येतो. ताजे विरजलेल्या दह्याचे पातळ ताक करून त्यात सैंधव मीठ, थोडेसे बारीक किसलेले आले, मिरेपूड घालून त्यावर किंचीत तूपावर भाजलेल्या हिंगाची फोडणी द्यावी. सुगंधीद्रव्य म्हणून वेलची पूड घालावी. असे ताक मंद झालेल्या जाठराग्निला प्रदीप्त करणारे आहे.
संत्र्याची चटणी ( नारंग योग ) – संत्री अम्ल मधुर रसाची असल्याने भूक वाढविणारी असतात. रुचि आणणारी, वातनाशक तसेच जीभेला आलेला चिकटपणां दूर करतात. चटणीकरीता संत्र्याची साले बिया काढून टाकावी. फक्त संत्र्याच्या फोडीतील आतील केशर घ्यावे. त्यात गरजेनुसार थोडी साखर व चवीकरता मिरेपूड घालावी असे मिश्रण जाठराग्निची वृद्धी करणारे अन्नाला चव आणणारे आहे.
थंडीच्या दिवसात उपयुक्त तिळाची चटणी –
थंडीच्या दिवसात तिळ घरी आणतोच. लाडू वडी पोळी अशा विविध स्वरूपात तिळाचे गोड पदार्थ प्रत्येक घरी तयार होतात. भूक वाढविणारी विशेषतः वातशामक चटणी तयार होऊ शकते. तिळ भाजून त्याची पूड करुन त्यात थोडासा लिंबाचा रस, चवीपुरते सैंधव व किसलेले अदरक फक्त घालावे. ही चटणी अतिशय पाचक, जाठराग्नि वाढविणारी आहे. हेमंत ऋतु ( थंडीच्या दिवसात) मधे अशी चटणी रुचिप्रद, बलवर्धक, जाठराग्नि प्रदीपक, वाताचे विकारांवर उपयुक्त आहे.
अशा या पाचक भूक वाढविणाऱ्या रुचकर चविष्ट पाककृती नक्की करून बघा.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला