अपूर्वा म्हणाली शेवंताला थँक्यू

Apoorva Nemalekar - Maharastra Today
Apoorva Nemalekar - Maharastra Today

कोणताही कलाकार हा त्याच्या आयुष्यातील माइलस्टोन संधीचा शोध घेत असतो आणि ती संधी मिळताच त्या संधीचं सोनं करतो. अभिनयक्षेत्रातील कलाकारांना तर त्यांना मिळणारी अशी एक भूमिका त्यांना लोकप्रियता मिळवून देत असते. आजपर्यंत अनेक अभिनेते व अभिनेत्री यांना अशी भूमिका मिळाली आहे. काहीच्या बाबतीत त्या भूमिकेसाठी खूप वाट पहावी लागते तर काहींना खूप संघर्ष करावा लागतो. पण काहीही असो, ती व्यक्तीरेखा तुम्ही अशी काही जगता की त्यानंतर कितीही भूमिका केल्या तरी लोक त्या कलाकाराला त्या अजरामर भूमिकेनेच ओळखतात. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apoorva Nemalekar) हिला या उक्तीचा अगदी पुरेपूर अनुभव आला आणि म्हणूनच अपूर्वाने शेवंताला थँक्यू म्हटले आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या भागात शेवंता या भूमिकेने जी काही कमाल केली त्या शेवंताने माझे आयुष्य बदलून गेले अशी कृतज्ञता व्यक्त करत आता या यामालिकेच्या तिसऱ्या भागातही शेवंताची मला साथ मिळणार असल्याचे अपूर्वाने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेली शेवंता ही भूमिका खूपच गाजली. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात हे पात्र पडदयावर आलं. अण्णा नाईक आणि शेवंता यांचे नाते नेमके काय होते हे या मालिकेच्या पहिल्या पर्वात एक गूढ होते, पण दुसऱ्या पर्वाचा सगळा यूएसपी म्हणजे ही शेवंता होती. खरंतर यापूर्वी आभास हा या मालिकेतून अपूर्वाने नायिका म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. पण त्या मालिकेनंतर अपूर्वाला तू जीवाला गुंतवावे या मालिकेत काम करण्याची संधी आली असली तरी या मालिकेत अपूर्वाची भूमिका ही लीड नव्हती. पहिल्या मालिकेत नायिका म्हणून दिसलेल्या अपूर्वा दुसऱ्या मालिकेत नायकाच्या वहिनीचा रोल मिळाला. पण तो रोलही तिने उत्तम निभावला होता. त्यानंतर मात्र अपूर्वा ऑफकॅमेरा गेली. दरम्यान अपूर्वाचे वजन वाढल्यामुळे ती अभिनयापासून लांब गेली. पण दोन वर्षापूर्वी अपूर्वाला शेवंता या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा या मालिकेच्या पहिल्या भागाचे यश व चर्चा पाहून ती या भूमिकेला नकार देणे शक्यच नव्हते. अपूर्वा सांगते, या मालिकेच्या पहिल्या पर्वाने जे काही गारूड प्रेक्षकांच्या मनावर घातले होते ते मी अनुभवले होते. जरी पहिल्या पर्वाचा मी भाग नसले तरी प्रेक्षक म्हणून मी ही मालिका पहात होते. जेव्हा या मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरू झाली तेव्हा शेवंता या पात्रासाठी मला विचारण्यात आलं.

खरंतर अण्णा या माझ्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या व्यक्तीची प्रेयसी साकारणं हे धाडसच होतं. शिवाय हे पात्र काहीसं अदाकारी, मादक असं होतं, अशा प्रकारची भूमिका मी याआधी कधीच केली नसल्याने त्याचंही वेगळं दडपण आलं होतं. पण या मालिकेची लोकप्रियता पाहता मला माझ्या मनाने ती भूमिका स्वीकारण्याचा कौल दिला आणि माझा तोच निर्णय माझे आयुष्य बदलून टाकणारा ठरला. त्याआधी कोणतीही भूमिका आली की माझ्या वाढत्या वजनाचा अडथळा होत होता पण शेवंता या भूमिकेच्या ऑनस्क्रीन प्रभावासाठी माझा लूक खूप उपयोगी आला. शेवंता आणि अण्णा ही जोडी हिट झाली आणि माझ्या अभिनय कारकीर्दीला नवे वळण मिळाले. म्हणूनच शेवंता या बाईने माझे आयुष्य बदलून टाकले असे म्हणत मी या व्यक्तीरेखेचे आभार मानले.

आता रात्रीस खेळ चाले या मालिकेचे तिसरे पर्व सुरू झाले आहे. या मालिकेत अण्णांच्या मृत्यूनंतर नाईकांच्या वाड्यात काय काय झाले ते दाखवण्यात येणार आहे. आता ही मालिका अण्णा आणि शेवंता यांच्या संदर्भाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही, त्यामुळे नव्या पर्वातही शेवंता आणि अण्णा यांच्या भेटीगाठी पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. अण्णा नाईक परत येणार अशा शब्दात या मालिकेची जाहीरात करण्यात आली होती. तर अपूर्वाने लाल रंगाच्या नऊवारी साडीतला, कपाळावर मळवट भरलेला फोटो शेअर कर शेवंता परत येणार अशी कॅप्शन देत सोशलमीडियावर उत्सुकता शेअर केली होती. इतकेच नव्हे तर जेव्हा या मालिकेचा दुसरा भाग संपला तेव्हा या मालिकेचे चित्रीकरण सुरू असलेल्या सावंतवाडीतील आकेरी या गावाला कायम मिस करेन असा एक भावूक व्हिडिओही अपूर्वाने शेअर केला होता. आता पुन्हा या गावात कधी येईन माहिती नाही असे म्हणणाऱ्या अपूर्वाला पुन्हाएकदा शेवंता साकारण्यासाठी नव्या पर्वात यावे लागेल अशी चिन्हे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button