राज्यात फडणवीस, पाटील हे दोघे सोडून अनेक महत्त्वाचे विषय आहेत; जयंत पाटलांचे पत्रकारांना उत्तर

Jayant Patil-Maharashtra Today

सातारा : गेल्या वर्षी देशासह राज्याला कोरोनाचा मोठा तडाखा बसला. राज्य सरकारचे एक वर्ष पूर्ण कोरोना आपत्तीतून सावरण्यात गेले आहे. मात्र, असे असले तरी कोरोनातून सावरून आता राज्य सरकार पूर्ण गतीने कामाला लागले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि घटक पक्ष विकासाला गती देण्याचे काम करत आहेत. असे असताना सगळीकडे गेल्यावर केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यांबद्दलचे प्रश्न विचारले जातात. पण राज्यात हे दोघे सोडून अनेक महत्त्वाचे विषय आहेत, असं उत्तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकारांना दिलं आहे. जयंत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार आता पूर्ण गतीने कामाला लागले आहे.

कोरोनाच्या धक्क्यातून आता सरकार हळूहळू सावरत आहे; पण मला मात्र सगळीकडे गेल्यावर पत्रकार मंडळी केवळ देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांबद्दलचे प्रश्न विचारतात. यावर प्रश्नांवर मी म्हणेन की, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय राज्यात अनेक विषय आहेत. आम्ही राज्याच्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. ” पुणे-बंगळुरू महामार्गावर जोशीविहीर (ता. वाई) येथे सातारा जिल्हा बँकेच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन आज जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार या मुद्द्यावर…

“चंद्रकांत पाटील हे वर्तमानपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्यांच्या भाषेसंदर्भात संपादकांना पत्र लिहून आक्षेप कळवणार असल्याचं मी ऐकलं. ते नक्की कोणत्या मुद्द्याबाबत बोलत आहेत हेच मला माहिती नाही. त्यांचा मूळ मुद्दाच मला माहिती नसल्याने त्यावर मी काही बोलणार नाही. त्यांच्याविषयी लिहिलेलं मी काहीही वाचलेलं नाही; कारण मी त्याच्या विषयापुरतं सीमित राहू इच्छित नाही. ” असं म्हणत त्यांनी चंदक्रांत पाटील यांना टोला लगावला.

चंद्रकांत पाटील यांना विश्रांतीची गरज

“चंद्रकांत पाटील सध्या पुणे, कोल्हापूर या राजकारणात अडकून पडले आहेत. याविषयीच्या चर्चेत राहून त्यांनी स्वतःला सीमित करून घेतले आहे. रोज काही ना काही बोलून स्वत:ला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. त्यांना आता खऱ्या अर्थाने विश्रांतीची गरज आहे. ” असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

महाविकास आघाडी सरकारबद्दल

“महाविकास आघाडीच्या घटक पक्षात चांगला समन्वय आहे. राज्यात अनेक वर्षे धरणांची व उपसा सिंचन, कालव्याची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांना चालना देण्याला आमचे प्राधान्य आहे. महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोणताही संभ्रम नाही. खरा संभ्रम विरोधकांमध्येच आहे. त्यांना मुद्दे सापडत नसल्याने फडणवीस आणि पाटील एवढाच विषय दिसत आहे. परंतु राज्यासमोर यांच्याशिवायही अनेक विषय आहेत. त्यावर आम्ही काम करत आहोत. ” असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER