ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सतावतेय चिंता, मायदेशी परतायचे तर कसे?

scott morrison - Glenn Maxwell - Maharashtra Today
scott morrison - Glenn Maxwell - Maharashtra Today

कोरोनाच्या (Corona) काळात भारतात सुरू असलेल्या आयपीएलमध्ये (IPL) खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन (Australia) खेळाडूंच्या अडचणी वाढतच आहेत. एकतर ऑस्ट्रेलियाकडील विमानसेवा बंद झाली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर ऑस्ट्रेलियाने १५ मे पर्यंत बंदी घातली आहे आणि आता तर ऑस्ट्रेलियन सरकार अतिशय कठोर कायदाच करण्याच्या विचारात आहे ज्याच्यानुसार ज्या व्यक्ती दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ भारतात राहून ऑस्ट्रेलियात परततील त्यांना ५ वर्षे तुरुंगवास किंवा ५० लाखांचा दंड करण्याचा प्रस्ताव आहे. यात खेळाडूंना सूट असेल की नाही हे स्पष्ट नाही त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंची समस्या गंभीर बनली आहे.

या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) याने म्हटलेय की आयपीएल आटोपल्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय संघासोबतच ब्रिटनमध्ये जातील. यासंदर्भातील पर्यायांचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) विचार करत आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या संघांना १८ जूनपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यासाठी या दोन्ही संघांचे खेळाडू आणि इंग्लंडचे खेळाडू आयपीएलनंतर ब्रिटनकडे प्रयाण करणार आहेत. यासंदर्भात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय प्रवासाचे काय धोरण राहील यावरच निर्णय अवलंबून राहील असे बीसीसीआयने म्हटले आहे.

मॅक्सवेलने म्हटलेय की आम्ही फक्त घरी परतण्याचा मार्ग शोधतोय. बीसीसीआय आणि दोन्ही देशांच्या सरकारांनी यावर मार्ग काढावा. त्यासाठी काही काळ आणखी थांबावे लागले तरी चालेल पण घरी परतण्याचा मार्ग मिळायला हवा. भारताबाहेर पडण्यासाठी आम्ही इंग्लंडमार्गे जाण्यासाठी आणि इंग्लंडमध्ये काही काळ थांबण्यासाठीही तयार आहोत पण भारताबाहेर पडणे महत्त्वाचे आहे.

दरम्यान बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी म्हटलेय की मॅक्सवेलने सुचवलेल्या या पर्यायासह इतर पर्यायांचा विचार सुरू आहे. प्रवास निर्बंधांच्या काळात परदेशी खेळाडूंच्या मायदेशी सुरक्षीत पोहोचण्याला आमचे प्राधान्य असेल. खेळाडूंचे आरोग्य व सुरक्षा याच्याशी तडजोड न करता सर्वात सुरक्षीत मार्ग निवडण्यात येईल असे धुमल यांनी म्हटले आहे.

यंदाच्या आयपीएलमधून तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी माघार घेतली असली तरी अजुनही १४ ऑस्ट्रेलियन खेळत आहेत. आयपीएल संपल्यानंतर जेव्हा बायोबबल नसेल तेंव्हा भारतात राहणे धोका पत्करण्यासारखे आहे. त्यावेळी भारताबाहेर पडणे हेच हिताचे राहिल. यासंदर्भात मी माझ्या मैत्रीणीशीही चर्चा केली आहे आणि बीसीसीआय आम्हाला इंग्लंडसाठीच्या त्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये स्थान देईल याची खात्री आहे असे मॅक्सवेलने म्हटले आहे.

बबलमध्ये आम्ही सुरक्षीत आहोत पण त्याबाहेर भारतात परिस्थिती गंभीर आहे. आमचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंधच येत नाही. आम्ही फक्त हॉटेल आणि मैदान एवढेच फिरतो. ऑस्ट्रेलियाने आपल्या सीमा बंद केल्या तर ती स्थिती फारच चिंताजनक असेल. १५ मे पर्यंत स्थिती सुधारेल अशी आम्ही आशा करतोय असेही मॅक्सवेलने म्हटलेय.

दरम्यान, आयपीएलमध्ये खेळणारे सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू वैयक्तिकरित्या गेलेले असल्याने त्यांना देशात परतण्यासाठी विशेष सवलती देता येणार नाहीत असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी स्पष्ट केले आहे.

यावर मॅक्सवेलने म्हटलेय की सद्यस्थितीत भारतात सुमारे पाच हजार ऑस्ट्रेलियन्स आहेत. आम्हाला विशेष सवलती द्याव्यात अशी आमची मागणी नाही पण भारतात स्थिती सुधारुन मायदेशी सुरक्षीत परतण्याचा आमचा मार्ग मोकळा होवो एवढीच आम्हाला आशा आहे. आम्ही भारतात आल्यापासून स्थती उलट बिघडली आहे. सर्वत्र त्याच बातम्या आहेत आणि त्या पचवणे अवघड आहे. एकावेळी ऑस्ट्रेलियात सातशे रुग्ण होते पण भारताच्या तुलनेत हा आकडा काहीच नसल्याची कल्पना असल्याचे मॅक्सवेलने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button