‘पाताल लोक’ वादाच्या भोवऱ्यात; निर्माती अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस

Anushka Sharma

मुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली ‘पाताल लोक’ ही सीरिज सध्या बरीच चर्चेत आहे. याची निर्मिती बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने केली असून तिची ही पहिलीच वेबसीरिज आहे. मात्र अनुष्काची ही पहिलीवहिली वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली असून तिला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

लॉयर गिल्ड मेंबर वीरेनसिंह गुरुंग यांनी ही कायदेशीर नोटीस धाडली आहे. सीरिजमध्ये जातिवाचक शब्दांचा वापर केल्याचा आरोप या नोटिशीत करण्यात आला आहे. तर शब्दांमुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाला असल्याचं म्हटलं आहे. मात्र या कायदेशीर नोटिशीवर अनुष्काकडून अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, सीरिजच्या दुसऱ्या भागात एक महिला पोलीस अधिकारी दिसत आहे. ती चौकशीदरम्यानच्या दृश्यामध्ये नेपाळी भूमिका साकारलेल्या व्यक्तीचा त्याच्या जातीवरून उल्लेख करते. यात वापरण्यात आलेला हा शब्द आक्षेपार्ह आहे. केवळ नेपाळी शब्दांचा वापर करण्यात आला असता तर आम्हाला आक्षेप नसता. मात्र, वापरलेला हा शब्द सीरिजमधून काढून टाकावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

१८ मे रोजी या विरोधात ऑनलाईन पिटिशन दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तसंच सीरिजमधील हा शब्द काढून टाकावा किंवा म्यूट करण्यात यावा व सबटायटलमध्ये तो ब्लर केला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अ‌ॅमेझॉन प्राईम या ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर १५ मेपासून ‘पातल लोक’ सीरिज प्रदर्शित झाली असून त्याला अनेकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER