
कुस्तीच्या विश्वचषक (Wrestling world championship) स्पर्धेत अंशू मलिक (Anshu Malik) हिने भारताला पहिले यश मिळवून दिले आहे. बेलग्रेड (Belgrade) येथील या स्पर्धेत तिने 57 किलोगटात रौप्यपदक पटकावले. ही 19 वर्षीय कुस्तीपटू अंतिम लढतीत मोल्दोव्हाच्या अॕनास्तेशिया निचिता हिच्याकडून 5-1 अशी पराभूत झाली.
अंशू ही कॕडेट गटात माजी विश्व व आशियाई विजेती आहे. तिने आतापर्यंत सहभागी झालेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकले आहे. यंदा रोम येथे ती सिनियर गटातील पहिली स्पर्धा खेळली. तिथे तिने कॕनडाची विद्यमान 59 किलोगट विश्वविजेती लिंडा मोरायस, 2014 ची युवा आॕलिम्पिक विजेती नाॕर्वेची ग्रेस बुलेन हिला मात दिली होती. त्यानंतर नवी दिल्ली येथील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही तिने कास्यपदक जिंकले.
बेलग्रेड येथील स्पर्धेतही तिची कामगिरी उल्लेखनीय राहिली. तिने पहिल्या फेरीत युरोपियन गेम्सच्या कास्यपदक विजेत्या एल्योना कोलेस्नीक हिला 4-2 आणि नंतर जर्मनीच्या लाॕरा मर्टेन्स हिला 3-1 अशी मात दिली. उपांत्य फेरीत तिने व्हेरोनिका चुमीकोव्हा हिच्यावर विजय मिळवला. रशियन व्हेरोनिकाचा यंदाचा हा पहिलाच पराभव होता.
अंतिम लढतीत निचिताने मात्र तिला मात दिली. निचिता ही 21 वर्षांची असून झपाट्याने नावारुपाला येत आहे. गेल्या वर्षी विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील पाचव्या स्थानासह ती आॕलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे आणि 2020 च्या युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत ती विजेती ठरलेली आहे. तिने अंशूच्या लढतीच्या आधीच्या लढती चितपट करुन जिंकल्या होत्या पण अंशु मलिकने तसे होऊ दिले नाही.
अंतिम लढतीत अंशू सुरुवातीला बचावात्मक खेळत होती आणि तिने वेळ घालवण्यासाठी एक गूण गमावला. पण मध्यंतरावेळी ती एक गुणाने मागे होती. दुसऱ्या सत्रात अंशूने आक्रमक धोरण स्विकारले पण निचिताने तिला खाली घेत दोन गूण घेतले आणि एक मिनीट 40 सेकंद शिल्लक असताना निचिताने आणखी दोन गूण घेतले.
अंशूचे रौप्यपदक हे या स्पर्धेतील भारताचे पहिले पदक ठरले. तिने जागतिक कास्य विजेत्या आणि आशियाई विजेत्या रवी दहियाच्या पहिल्या फेरीतील अपयशाची निराशा भरुन काढली. अंशूने यश मिळवलेल्या 57 किलोगटात भारताने आॕलिम्पिक स्थान निश्चित केलेले नाही. या वजनगटात पूजा ढंडा हिची तिला स्पर्धा असेल आणि बेलग्रेडमधील हा अनुभव तिला आॕलिम्पिक पात्रतेसाठी मदतगार ठरेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला