भाजपाला आणखी एक धक्का; पासवान ‘एनडीए’तून बाहेर पडणार?

नवी दिल्ली : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मित्रपक्षाना सोबत घेण्याचा निर्णय घेतला असला तरी, मोदी सरकारच्या धोरणांना वैतागून उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकसमता पार्टीने एनडीएची साथ सोडल्यानंतर भाजपाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. आता रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष देखील भाजपची साथ सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोदी सरकारच्या धोरणामुळे एनडीएतील मित्रपक्ष चांगलेच नाराज आहेत. सरकारकडून आपला योग्य सन्मान मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. लोक जनशक्ती पक्षासोबत जागा वाटपाचा तिढा सध्या सुरु आहे. यावरुन रामविलास पासवान यांचे चिरंजीव आणि पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी भाजपला इशारा दिला आहे. जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर एनडीएचं मोठं नुकसान होऊ शकतं, असं सूचक ट्विट चिराग पासवान यांनी केलं आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. राज्य आणि केंद्रातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेनं आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला तरी, भाजपा मात्र युती कायम असावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांमध्ये काल उशीरा रात्री सह्याद्री अथितीगृहावर बैठक पार पडली. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तीन राज्यातील सत्ता गमावल्यामुळे महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत जाहीर वाद टाळण्यावर या बैठकीत एकमत झाल्याची माहीती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.