नागपूर खंडपीठाचा ‘त्याच’ धर्तीवर आणखी एक ‘पॉक्सो’संबंधी निकाल

Nagpur Bench of the Bombay High Court - POCSO Act
  • आता आरोपीने हात धरणे व पॅन्टच्या उघड्या चेनचा मुद्दा

नागपूर : अल्पवयीन मुलीचा आरोपीने हात धरणे आणि त्या वेळी आरोपीच्या पॅन्टची चेन उघडी असणे हा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (POCSO Act) ‘लैंगिक अत्याचारा’चा (Sexual Assault) गुन्हा ठरत नाही, असा निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

गडचिरोली येथील लिब्नस फ्रान्सिस कुजूर या ५० वर्षांच्या मजुरास ‘पॉक्सो’ विशेष न्यायालयाने या गुन्ह्याखाली दोषी ठरवून गेल्या आॅक्टोबरमध्ये सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध लिब्नस याने केलेले अपील (फौजदारी अपील क्र. ४४५/२०२०)मंजूर करताना न्या. पुष्पा गणेरीवाला यांनी हा निकाल दिला. न्या. गणेरीवाला यांनी लिब्नस यास ‘पॉक्सो’ कायद्यान्वये निर्दोष ठरवून त्याऐवजी भारतीय दंड विधानाखाली विनयभंगाच्या गुन्हयासाठी दोषी धरले. या गुन्ह्यासाठी लिब्नस याने आत्तापर्यंत भोगलेला पाच महिन्यांचा तुरुंगवास ही पुरेशी शिक्षा आहे, असे म्हणत त्यांनी लिब्नसला सोडून देण्याचाही आदेश दिला.

या प्रकरणातील मुलगी पाच वर्षांची होती व संबंधित घटना फेब्रुवारी २०१८ मध्ये घडलेली होती. मुख्यत: मुलीच्या आईने फिर्यादी या नात्याने दिलेल्या साक्षीच्या आधारे विशेष न्यायालयाने लिब्नस यास ‘पॉक्सो’ खाली दोषी ठरविले होते. मुलीच्या आईने अशी साक्ष दिली होती की, त्या दिवशी संध्याकाळी मी कामावरून घरी आले तेव्हा आरोपी आमच्या घरात शिरलेला होता, त्याने माझ्या मुलाचा हात पडलेला होता व त्याच्या पॅन्टची चेन त्यावेळी उघडी होती.

न्या. गणेरीवाला यांनी निकालपत्रात म्हटले की, ‘पॉक्सो’ कायद्याच्या कलम ७ मध्ये ‘लैंगिक अत्याचारा’ची जी व्याख्या केलेली आहे त्यानुसार प्रत्यक्ष लैंगिक समागम सोडून अन्य प्रकारच्या लैंगिक कृती करण हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. त्यात आरोपीने पीडितेच्या गुप्तांगांना हात लावणे किंवा तिला स्वत:च्या गुप्तांगांना हात लावायला लावणे अशा विशिष्ठ कृतींचा वर्णनासह उल्लेख करून पुढे ‘अन्य प्रकारची कृत्ये’ असे म्हटले आहे.  येथे ‘अन्य प्रकारचे कृत्य’ म्हणजे येथे कोणतेही कृत्य अपेक्षित नाही तर ज्या कृत्यांचे आधी वर्णन केले आहे तशा प्रकारचे अन्य कृत्य अभिप्रेत आहे. त्यामुळे आरोपीने पीडितेचा हात पकडणे आणि त्यावेळी त्याच्या पॅन्टची चेन उघडी असणे याचा या ‘अन्य प्रकारच्या कृत्यां’मध्ये समावेश होत नाही.

अल्ववयीन मुलीला विवस्त्र न करता आरोपीने तिच्या छातीवरून हात फिरविणे किंवा तिची वक्षस्थळे दाबणे हा ‘पॉक्सो’ कायद्यान्वये ‘लैंगिक अत्याचारा’चा गुन्हा ठरत नाही, हा आता वादग्रस्त ठरलेला निकालही न्या. गणेरीवाला यांनीच दिला होता. खरे तर लिब्नसच्या प्रकरणातील हा निकाल त्या वाजग्रस्त निकालाच्या चार दिवस आधी म्हणजे १५ जानेवारी रोजी दिलेला आहे. अ‍ॅटर्नी जनरलनी केलेल्या तोंडी विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयाने त्या वादग्रस्त निकालास बुधवारीच अंतरिम स्थगिती दिली होती.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER