राष्ट्रवादीचा आणखी एक मंत्री गोत्यात; पत्रकाराच्या खुनाशी संबंध असल्याचा आरोप

Prajakt Tanpure

अहमदनगर : राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला वेगळा ट्विस्ट आला आहे. पोलीस चौकशीच्या आधारे ही हत्या भूखंडप्रकरणातून झाली असून तो भूखंड ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या कंपनीशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. या भूखंडासंबंधी तक्रारी करून अडचणी निर्माण करत असल्यानेच दातीर यांची हत्या झाली आहे. त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते, माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी केला आहे. कर्डिले यांच्या या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) आणखी एक मंत्री अडचणी सापडण्याची शक्यता आहे.

६ एप्रिलला राहुरीत पत्रकार दातीर यांचे अपहरण करून हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांचा तपास सुरू असताना या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. राहुरीचे माजी आमदार कर्डिले यासंबंधी शनिवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या घटनेसंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी कर्डिले म्हणाले, ‘पत्रकार दातीर यांच्या हत्येची आम्ही बारकाईने माहिती जाणून घेतली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली. तेव्हा कळाले की, हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे. मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. ही कंपनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे असून सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागीदार आहेत.दातीर यांना पठारे कुटुंबीयांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या मिळाल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दाखल केली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या.

मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही. १८ एकरची मालमत्ता लाटण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला असेल. ‘राहुरीत तनपुरे कुटुंबाची ही पद्धत आहे. एखादी मालमत्ता बळकवायची असेल तर तेथे आधी आरक्षण टाकतात, सौदा करतात आणि नंतर आरक्षण उठवून आणतात. त्यामुळे या प्रकरणात १८ एकरशी संबंधित जे जे कोणी सहभागी असतील त्यांच्याविरुद्ध संगनमताने दातीर यांचा खून केल्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी. ही मागणी आम्ही पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आमच्याकडे आहेत. ती आम्ही पोलिसांना देण्यास तयार आहोत. दातीर यांच्या पत्नीच्या जीवालाही धोका आहे. आम्ही त्यांना भेटून आलो. त्यावेळी त्यांनी बंदोबस्त देण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा. राजकीय पाठबळ असल्याशिवाय एवढा गंभीर गुन्हा होऊ शकत नाही. यामध्ये खोट्या आरोपींना अटक न करता खऱ्या आरोपींना अटक करावी, अशी मागणी कर्डिले यांनी केली आहे.

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनाही आम्ही या प्रकरणाची माहिती देऊन पाठपुरावा करण्याची विनंती करणार आहोत. येत्या १५ दिवसांत कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलक भूमिका घेऊ. दातीर यांच्या नातेवाइकांना आणि त्यांच्या समाजाला याची माहिती आहे; मात्र आरोपींना राजकीय संरक्षण असल्याने ते तक्रार करण्यासाठी भीत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आपण यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही कर्डिले यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button