
अमरावती :- राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीला सुगीचे दिवस आले आहेत. राष्ट्रवादीत दररोज इन्कमिंग होत असल्याचे दिसून येत आहे. भाजपमधील अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) हेसुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी परिवार संवादयात्रा सुरू आहे. काल अमरावती येथे यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हा परिवार संवाद कार्यक्रम केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमातून पत्रकारांना व इतर कार्यकर्त्यांना बसण्यास मनाई करण्यात आली होती.
परंतु, कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पूर्णवेळ हजेरी लावली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत करत थेट सभेच्या व्यासपीठावर जाऊन बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भुयार यांनी भविष्यातील राजकीय संकेत तर दिले नाहीत ना? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींमुळे मंत्रिपद न मिळाल्याची खंत देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली होती. तसंच माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर देवेंद्र भुयार यांची नाराजी असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
माजी खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सध्या मधुर संबंध आहेत. पण शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला कधी हजेरी लावली नाही. भुयार यांनी मात्र यापेक्षा वेगळी भूमिका घेत आपली आगामी राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने असेल हे स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष या नात्याने भुयार उपस्थित राहिल्याचे सांगण्यात येते. मात्र, या महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेनेचा कोणताही नेता जयंत पाटील यांच्या संवादयात्रेत सहभागी नव्हता, याकडेही लक्ष वेधण्यात आले.
मध्यंतरीच्या काळात खुद्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीमध्ये जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यातील वाद हा राज्याला सर्वश्रुत आहे. या भेटीमुळे दोन्ही नेत्यांमधील वाद निव्वळ होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला