सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अवतरले आणखी एक महाराज; कॉंग्रेसमधून लढण्यास इच्छूक

विधानसभेसाठी काँग्रेसमध्येही महाराज दिसणार अशी चर्चा काँग्रेसभवनमध्ये सुरू झाली आहे.

Maharaja of Avatar

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील लोकसंख्येचा, शेजारच्या तालुक्यांचा विचार करता हा जिल्हा विविध जाती धर्मांच्या संगतीनं मोठा झालेला जिल्हा दिसतो. अक्कलकोट, पंढरपूर या शेजारच्या तालुक्यांनी या जिल्ह्याला धार्मिक महत्व प्राप्त झालेलं दिसून येतं तेथेच सोलापूर जिल्हयात मुस्लिमांचीही भव्य वस्ती पाहायला मिळते. त्यामुळेच येथे लोकसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचा विजय निश्चित मानला जात होता.

तर, आतापर्यंतच्या सोलापूरच्या राजकारणात एक मागासवर्गीय जातीतून ओळख निर्माण करणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूरवर राज्य करू शकले. त्याच सोलापुरात यंदा जयसिध्देश्वर महास्वामी महाराजांनी भाजपच्या तिकीटावर बाजी मारली आणि एक महाराज खासदार पदावर पोहचले. तेथेच आता दुसरे महाराज अवतरले आहे. हे महाराज मात्र,भाजपच्या महाराजांना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.

नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास काँग्रेसकडून इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी बुधवारी काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज कॉंग्रेस भवनमध्ये सादर केला आहे. त्यामुळे एकवेळी भाजपचे खासदार डॉ़ जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यासाठी प्रयत्न केलेले श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी आता काँग्रेसच्या वाटेवर असून भाजपच्या जयसिध्देश्वर महास्वामींना टक्कर देण्यासाठी तयार झाले आहेत. सोलापुरच्या राजकारणात याचीच चर्चा आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सोलापूर जिल्ह्यातील विधानसभामतदारसंघात इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी अद्यापही आपला अर्ज काँग्रेस भवनाकडे केलेला नाही तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. या पार्श्वभूमीवर नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी नामदेव पांढरे या आपल्या सेवकामार्फत काँग्रेसभवनमध्ये इच्छुक म्हणून अर्ज सादर केला आहे़ याला मैंदर्गी मठाचे मठाधिपती नीलकंठ शिवाचार्य महास्वामी यांचा पाठींबा आहे़ या दोघांनीही खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या विजयासाठी काम केले होते.

विशेष म्हणजे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना निवडून आणण्यात श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, त्यांनी चक्क काँग्रेसकडे उमेदवारी मागितल्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसमध्येही महाराज दिसणार अशी चर्चा काँग्रेसभवनमध्ये सुरू झाली आहे.