आणखी एका नेत्याचे विवाहबाह्य संबंध उघड करणार; दरेकरांचा इशारा

Pravin Darekar

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे मोठी रणनीती आखली जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सत्ताधारी पक्षाच्या आणखी एका आमदारावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय राठोड यांच्यानंतर विरोधकांच्या निशाण्यावर कोणता आमदार आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

मागील काही दिवसांपासून कलाकार रेणू शर्मा कथित बलात्कारप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते. या प्रकरणी राज्यातील बड्या नेत्यांनाही प्रतिक्रिया देणे भाग पडले होते. धनंजय मुंडे यांचे प्रकरण निवळल्यानंतर टीकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.

आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्याने भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली होती. आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराचा प्रताप उघड करण्याचा इशारा दिला आहे.

प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सत्ताधारी पक्षातील एका आमदाराचादेखील पर्दाफाश आज विधिमंडळात करणार आहे. संबंधित आमदाराची डीएनए चाचणी करावी, अशी मागणी न्यायालयात प्रलंबित आहेत. तथाकथित पत्नी आणि मुलगा यांनीही त्यांच्या डीएनए टेस्ट मागणी केली होती. मात्र पोलिसांकडून कुठलीही चौकशी झालेली नाही. सरकारने या आमदाराची चौकशी करावी. अशी मागणी सभागृहात करणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणीदेखील तू मारल्यासारखे कर, तू रडल्यासारखे कर. असे सुरू आहे. त्यामुळे संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला जात नाही.

महाविकास आघाडीचा आणखी कोणता नेता किंवा आमदार भाजपच्या निशाण्यावर आहे, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER