पवारांचा आणखी एक सन्मान, सोलापूर विद्यापीठाकडून डी. लिट सर्वोच्च मानद पदवी मिळणार

Sharad Pawar - NCP

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना आणखी एक सर्वोच्च सन्मान मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने डी. लिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही पदवी देण्यासाठीचा प्रस्ताव सिनेटच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी हा विषय आज झालेल्या सिनेट सभेत मांडला. त्यानंतर या विषयाला सिनेट सदस्यांनी मंजुरी दिली आहे.

या विषयाला सिनेट सभेत मंजुरी मिळाली असली तरी त्यापुढील विविध टप्प्यात हा प्रस्ताव दाखल होऊन अखेरीस राजभवनातून याबाबतची मंजुरी मिळाल्यानंतर हा पदवीप्रदान सोहळा संपन्न होणार आहे. सोलापूर विद्यापीठातर्फे देण्यात येणारी ही दुसरी डी.लिट पदवी राहणार आहे. सोलापूर विद्यापीठातर्फे पहिली डि. लिट पदवी ही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आली आहे. तर 2014 साली ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एस्सी) या मानद पदवीने सन्मानित केले होते. त्यानंतर आता सोलापूर विद्यापीठाची ही दुसरी डि. लिट पदवी ज्येष्ठ नेते आणि पद्मविभूषण शरद पवार यांना देण्यासाठीची प्राथमिक मंजुरी सिनेट सभेत देण्यात आली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना डि. लिट पदवी देण्यासाठी प्रयास संघटनेच्यावतीने विद्यापीठाला निवेदन देण्यात आले होते. त्याचा पाठपुरावा सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी केला. आज विद्यापीठाची 23 वी सिनेट सभा झाली. यावेळी सूचक म्हणून सचिन गायकवाड यांनी या विषय मंजुरीसाठी मांडला होता तर सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. राजेंद्र गायकवाड, डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER