‘ठाकरे’ सरकारला आणखी मोठा धक्का, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएकडे जाणार?

Mansukh Hiren-Sachin Vaze-CM Thackeray

मुंबई :- मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणामुळे (Mansukh Hiren case) संकटात सापडलेल्या ठाकरे सरकारचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आता याप्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून काढून घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची शक्यता आहे. सध्या एनआयए (NIA) केवळ अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर राज्य दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन हत्याप्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडीच्या चोरी प्रकरणाचा तपास करत आहे.

मात्र, मागील दोन दिवसांत घडून आलेल्या घडामोडींनंतर आता एटीएसकडे असणारी या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयएकडे सोपवला जाण्याची दाट शक्यता आहे. सचिन वाझे यांना अटक केल्यापासून एनआयएने तपासाला वेग दिला आहे. गेल्या दोन दिवसांत एनआयएला अनेक सबळ पुरावे मिळाले आहेत. या तिन्ही प्रकरणांच्या केंद्रस्थानी सचिन वाझे हेच आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रकरणांचा एकत्रित तपास एनआयएकडे सोपवण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ज्या रात्री मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडी सापडली त्याचदिवशी सकाळी सचिन वाझे हे मुंबईत मनसुख हिरेनला भेटले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. हा सचिन वाझे यांच्याविरोधातील सर्वात मोठा पुरावा असल्याचे मानले जात आहे.

अंबानी स्फोटक प्रकरणात वापरण्यात आलेल्या गाड्यांच्या नंबरप्लेट बनावट असल्याचे समोर आले आहे. या नंबरप्लेट सचिन वाझे यांच्या कोणत्या सहकाऱ्याने तयार केल्या होत्या का, याचा तपास सुरु आहेत. सचिन वाझे यांच्या ठाणे येथील घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज २ मार्च रोजीच मुंबई पोलिसांनी काढून नेल्याची माहिती समोर येत आहे. सचिन वाझे यांच्या साकेत सोसायटीत जवळपास ५१ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यांचे फुटेज असणारा डीव्हीआर पोलिसांनी नेला, अशी माहिती येथील सुरक्षारक्षकांनी दिली. हा डिव्हीआर नेमका कोणत्या पोलिसांनी नेला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता याप्रकरणातील गुढ आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER