ममता बॅनर्जींना पुन्हा एक झटका; TMC नेत्याचा भाजपात प्रवेश

Maharashtra Today

नवी दिल्ली :- पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या  अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. अशातच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पुन्हा एकदा चांगलाच झटका बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांतील मतदान पार पडले. मात्र, अजूनही पक्ष बदलणे सुरूच आहे. बंगालच्या अलिपूरदार जिल्ह्यात शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची बैठक झाली. यातच हजारो समर्थकांसह तृणमूलच्या एका नेत्याने भाजपात (BJP) प्रवेश केला.

तृणमूल काँग्रेसचे नेते मोहन शर्मा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मोहन शर्मा हे तृणमूल काँग्रेसचे जुने नेते आहेत. त्यांनी पक्षासाठी अलिपूरदार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. तसेच ते अलिपूरदार जिल्हा परिषदेचे सल्लागारही होते. अमित शहांच्या उपस्थितीत मोहन शर्मा यांच्यासहित टीएमसीच्या हजारो कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपच्या सेंट्रल कमिटीचे महासचिव अरविंद मेनन यांनी मोहन शर्मा यांच्या हाती पक्षाचा झेंडा सोपवला.

मोहन शर्मा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे टीएमसीला मोठ्या प्रमाणात राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या २९४ जागांसाठी आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. २७ मार्च आणि १ एप्रिल रोजी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील ३१ जागांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या वर्षी भाजपा आणि टीएमसीमध्ये टक्कर पाहायला मिळत आहे.

“ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरून उरेल”
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, चार राज्यांमधील निवडणुका या देशाच्या राजकारणाची भावी दिशा ठरवतील. विशेषतः पश्चिम बंगाल आणि आसाम असे आहे. बंगालमध्ये भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरून उरेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. यासोबतच लॉकडाऊन किंवा कोरोनाचे राजकारण करू नये. यामुळे निवडणुकीच्या निकालांनंतरच देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे आणि विरोधी पक्षांच्या आघाड्या स्थापन होऊन ते कोणती भूमिका घेत आहेत हे स्पष्ट होईल, असे राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मातृभूमीसाठी ममतादीदींच्या लढ्याचं स्वागत करत शेवटी विरोधकांना एकत्र यावे लागेल – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button