
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये येत्या एक ते दोन महिण्यात विधासनसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. सोबतच राजकारणही तापू लागलं आहे. आधी सुवेंदू अधिकारी यांच्यासह काही खासदार आणि आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आता थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी आपला राजीनामा ममता बॅनर्जींना न सोपवता थेट राज्यपालांकडेच दिला आहे. राजीव बॅनर्जी हे भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता असून त्यांचा राजीनामा हा ममता बॅनर्जींसाठी (Mamata Banerjee) मोठा धक्का मानला जात आहे.
पश्चिम बंगालचे वन मंत्री राजीव बॅनर्जी हे मागील काही महिन्यांपासून नाराज होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेऊन सोपवला. साधारणपणे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांना पाठवायचा असतो. परंतु, राजीव यांनी मुख्ममंत्र्यांकडे राजीनामा पाठवून दुसरा राजीनामा थेट राजभवनात जाऊन सोपवला. यावरून त्यांना ममता बॅनर्जी यांच्याशी कोणतीही चर्चा करायची नसल्याचं स्पष्ट होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
राजीव बॅनर्जी यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. येत्या 30 आणि 31 जानेवारी रोजी गृहमंत्री अमित शहा बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राजीव बॅनर्जी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असं सूत्रांनी सांगितलं. मात्र, त्याला अद्याप कुणी दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, राजीव बॅनर्जी बऱ्याच काळापासून पक्षात नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्याचा पक्षातून मोठा प्रयत्नही झाला होता. मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी त्यांच्यासोबत तीन बैठकाही घेतल्या होत्या. मात्र, त्यातून कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे अखेरीस राजीव बॅनर्जी यांनी राजीनामा दिला. गेल्या काही काळापासून ते मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्येही गैरहजर होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला