पवार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत, खडसे पिता-पुत्रीला विधानपरिषदेत पाठवणार?

Sharad Pawar - Rohini Khadse - Eknath Khadse

मुंबई :- विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ जागांसाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही घटक पक्ष प्रत्येकी चार नावांचा बंद लिफाफा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे आज सुपूर्द करणार आहेत. यात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोशियारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध लक्षात घेता ही नावे मान्य केली जातील काय याबाबत शंका आहे.

राज्यपालनियुक्त सदस्य हे कला समाजसेवा या क्षेत्रातले असावेत, असा निकष आहे. यामुळे यात राजकीय नेत्यांची नावे पुढे करण्यावर मर्यादा आहेत. मात्र, राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून नावे पाठविताना तिन्ही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तिन्ही पक्षांकडून नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सरकारनामाने काही नावांची यादीही प्रकाशित केली आहे.

विधान परिषदेच्या आमदारकीच्या यादीत शिवसेनेकडून अनपेक्षित नावे…

शिवसेनेने (Shiv Sena) समाजसेवा, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातील नावेच पुढे पाठवण्याचे ठरवले आहे. समाजसेविका सिंधुताई सपकाळ, अभिनेते आदेश बांदेकर, सुबोध भावे यांची नावे निश्चित झाली आहेत. युवासेनेला प्रतिनिधित्व की उध्दव ठाकरे यांची विश्वासू मिलिंद नार्वेकर असा तिढा आहे. अडचणीच्या काळात सुभाष देसाई, संजय राउत आणि मिलिंद नार्वेकर या तिघांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली होती. त्यातील नार्वेकर यांना अद्याप राजकीय पद मिळाले नाही मात्र, त्यांचा विचार होणार की त्यांचे महत्व कमी करण्यासाठी युवा सेनेतील नवा चेहरा समोर आणणार हे पाहावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) काही नावांवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यपाल निकषात बसणारी नावेच मान्य करतील हे लक्षात घेत एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि राजू शेटटी (Raju Shetti) यांची नावे पुढे पाठवायची का याबाबत चर्चाही झाली होती. खडसे यांच्या कन्या रोहिणी यांचे सहकार क्षेत्रातील काम लक्षात घेता त्यांचे नावपाठवण्याची शक्यता बळावली आहे.

काँग्रेसची नावे अद्याप मुंबईतील पक्ष कार्यालयाला मिळालेली नाहीत. दिल्लीतून ही नावे अंतिम होऊन कोणत्याही क्षणी प्राप्त होतील, असे राज्यातले नेते सांगत आहेत. मात्र, रात्री उशीरापर्यंत ही नावे येथे पोहोचली नव्हती. काँग्रेसकडून सत्यजित तांबे, प्रवक्ते सचिन सावंत, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, रजनी पाटील या नावांबरोबरच मुजफ्फर हुसेन, नसीम खान आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचीही नावे चर्चेत आहेत. एका मंत्र्याने मात्र, दिल्लीतून अंतिम यादी येईपर्यंत काहीही सांगता येत नसल्याचे स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : खडसेंप्रमाणे योग्यवेळी इतर नेत्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER