पालघरच्या झुंडहत्या प्रकरणी आणखी ८९ आरोपींना जामीन

Palghar mob lynching case - Court grants bail to 89

पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यात गढचिंचळे गावी दोन साधू आणि त्याच्या ड्रायव्हरची संतप्त जमावाकडून हत्या केली जाण्याप्ररणी अटकेत असलेल्या आणखी ८९ आरोपींना विशेष न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला.

न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी या संदर्भात दिलेले सविस्तर निकालपत्र अद्याप उपलब्द झालेले नाही. मुळात या खटल्यात २५१ आरोपींना अटक केली गेली. त्यांच्यापैकी १२६ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले गेले. गंभीर आरोप असलेले अद्यापही तुरुंगात असलेले आरोपी सोडले तर इतर बहुतांश आरोपी आता जामिनावर मोकळे झाले आहेत.

आताच्या या आरोपींतर्फे अमृत अधिकारी आणि अतुल पाटील या वकिलांनी काम पाहिले. या आरोपींना निव्वळ संशयावरून अटक केली गेली. त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. शिवाय तीन स्वतंत्र घटनांचा मिळून एकच ‘एफआयआर’ नोंदला जाण्यासही त्यांनी आक्षेप घेतला. सरकारतर्फे विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर सतीश मानेशिंदे यांनी तर मयत साधूंच्या कुटुंबियांच्या वतीने अ‍ॅड. पी. एन. ओझा यांनी काम पाहिले. खटल्याची पुढील सुनावणी  १५ फेब्रुवारी रोजी होईल.

देशभर गाजलेली ही घटना १६ एप्रिल रोजी घडली होती. अवयव काढून घेऊन त्यांची अवैध विक्री करण्यासाठी मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा त्यावेळी पालघरच्या गढचिंचले व आसपासच्या गावांमध्ये पसरल्या होत्या. त्यामुळे गावकरी सावध होते व ते रात्री गस्त घालत. चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७० वर्षे) व त्यांचा शिष्य सुशिलगिरी महाराज (३५) मोटारीने गुजरातकडे निघाले होते. वाटेत ते चहा-नाश्ट्यासाठी थांबले. तेथे आजूबाजूला जमलेल्या लहान मुलांना त्यांनी चॉकलेटे दिली. यावरून ते बहुधा मुले पळविणाºया टोळीतील असावेत, असा समज करून घेऊन २५०-३०० गावकरी जमले. त्यांनी एवढी बेदम मारहाण केली की त्यात हे दोन्ही साधू आणि त्यांचा ड्रायव्हर  निलेश तेलगडे (३०) असे तिघेही मृत्यू पावले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER