कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी मदतीची घोषणा; मिळणार इतके लाख …

Anil Parab

मुंबई : कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मदत देण्याची घोषणा केली. जे निकषात बसत असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे मदत दिली जाईल. मात्र, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत मिळेल.

याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या परिवारांना ५० लाख रूपये देण्याच्या सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढिवण्यात आल्याचे त्यांनी जाहिर केले.

एसटीने ७४ व्या वर्षात पदार्पण केले. मंगळवारी एसटीचा ७३ वा वर्धापनदिन पार पडला. कोरोनाचे संकट पाहता यंदाही एसटीचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच महामंडळातील विविध विभागांचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या महामारीत एसटी महामंडळाच्या ज्या कोरोना योद्ध्यांनी कर्तव्य बजावताना प्राणाची आहुती दिली. त्या कर्मचाऱ्यांना ॲड. अनिल परब यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

वारसांना सहा महिन्यात नोकरी

ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश ॲड. अनिल परब यांनी प्रशासनाला दिले.

महाकार्गोच्या चालकांना १५० रूपये भत्ता

कोरोना काळात गेल्यावर्षी एसटी महामंडळाने व्यावसायिक मालवाहतूक क्षेत्रात दमदारपणे पदार्पण केले. खासगी वाहतूकीच्या तुलनेत किफायतशीर दर असल्याने एसटीची ‘महाकार्गो’ ही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली आहे. मालवाहतूक करताना चालकांना अनेकदा परगावी जावे लागते. तेथे मुक्काम करावा लागतो. अशावेळी त्यांना पदरमोड करून आपला खर्च भागवावा लागतो. त्या चालकांना परगावी मुक्काम करावा लागल्यास सरसकट १५० रूपये प्रतिदिन भत्ता देण्याची घोषणा परब यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button