“बालकास अग्रहक्क ” हाच मंत्र घोषवा

Balakas Agrahak - Maharashtra Today

आपल्या संस्कृतीचे मूळ असलेले ‘आपले मूल ‘स्वस्थ कसे होईल ? याविषयी,मुल योग्य प्रकारे कसे वाढावे यासाठी शांताबाई किर्लोस्करांनी एका गीतात म्हटले आहे,”जागवा जागवा, सकल विश्व जागवा, बालकास अग्रहक्क ,हाच मंत्र घोषवा !”

मला स्वतःला याला अनुसरून एका सुंदर बालगीताची आठवण होते,”स्वप्नी आले बाई एक मी गाव पाहिला बाई!”हेच ते स्वप्नातले गाव इथे अपेक्षित आहे असं मला वाटतं . पक्षी किलबिलाट करत आहेत, झुळझुळणारे झरे आहेत, फुलपाखरे आहेत आणि मुख्य म्हणजे इथे सगळी फक्त मुलेच आहेत, ही या गावाची खरोखरच एक न्यारी अशी गंमत आहे. म्हणजे थोडक्यात जिथे फक्त मुलेच अग्रस्थानी असावी ही कल्पना किती वर्षांपूर्वी कवयित्री वंदना विटणकर यांनी सुद्धा मांडली आहे. पण सध्याची परिस्थिती कुणाला वेगळी सांगायची गरज आहे का ?

फ्रेंडस् ! “खेळणे पुरे आता ! अभ्यास कर ! हाताची घडी तोंडावर बोट . आता आवाज आला तर बघा भिंतीवर आता एक जरी रेघोटी ओढलेली दिसली तरी बघा ! टीव्ही ,वर्तमानपत्रे ,आजपासून बंद . दहावीची परीक्षा यावर्षी महत्त्वाची . सकाळपासून शाळा ,क्लासेस ,बास्केटबॉल कोचींग . मगअभ्यास केव्हा करणार ? म्हणे झोप येते ! दररोजची नाटकं तुझी .” हे असे संवाद नवीन नाहीत. मुलांचा किती जीव गुदमरत असेल त्यात.

आपली मुलं काय काय गमावत आहेत याचा विचार करायला बसलं तर अशा अनेक गोष्टी सापडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती निसर्ग गमावत आहेत. कारण हाता पायाला माती लागुच नये ही आपली कल्पना. शूज शिवाय मातीत गेला म्हणजे तर म्हण चूकच ! ” जर्मस असतात ना त्यात ! मग आपलं स्टमक पेन करतं ना राजा! आणि तो शर्टचा हँकी कुठे गेला ,bad manners असतात न ते !” अशी आजच्या मॉमची भाषा ! अश्या हालचाली, खेळ, भाषा, गमावतात आहेत ते ! त्याच बरोबर माणसाचा प्रेम ,विश्वास, शांती हे देखील गमावत आहेत. साध घरचं अन्न , साध्या सुती कपड्याचा मऊ स्पर्श याचं सुख सुद्धा हरवत आहे ,कारण आजी हरवली आहे म्हणा. आठवडा भर काम करून दमलेली आई, चेंज हवाच म्हणून पावभाजीच्या दुकानाच्या रांगेत एक तास उभी राहील पण घरात पटकन गरम खिचडी ,किंवा पिठलं भाकरी करून मुलं बाळ,नवरा यांच्या बरोबर जास्त वेळ नाही घालवणार! हे सगळं अवकाश जे हरवत आहे ते मोबाईल ,लॅपटॉप ,आयपॅड ,टीव्ही यांनी भरून निघणे शक्य नाही .

खरं म्हणजे मुलांच्या संदर्भात कोणती पण गोष्ट आपण जर करत असू तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की ती अत्यंत प्रेमाने ,आपुलकीने ,जिव्हाळ्याने, जबाबदारीने आणि पूर्ण मनापासून केली पाहिजे. कारण मुळात ती आपल्या संस्कृतीच्या रुजवातीसाठी आहे . आणि मुलाला असं वाढवतात असताना घर ,शाळा आणि समाज या तिन्ही पातळ्यांवर मुल अग्रस्थानी असायला हवे .कारण या तीन ठिकाणी मूल हे वावरत असतं. थोडक्यात “स्वप्नी आलेले गाव कसे असावे ? “असा विचार केला तर मूल जेव्हा सर्वप्रथम घरात दंगा करते ,आरडाओरडा करते, आपटते, तोडते , नासधूस करते. घरातल्या सगळ्या लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की हे त्याचे खेळ आहेत, क्रियाशीलता आहे हा खेळ म्हणजे नुसती करमणूक नाही तर विकासांच्या या टप्प्यावरची धडपड आहे. काही समजण्याची धडपड आहे.

आणि खरं म्हणजे आपण जर विचार केला तर पहिला खेळ हे खुळखुळा नसतो, तर आपली गर्भावस्थेतील नाळ हे पण बाळ पकडत असतं आणि सोडत असतं. बरेचदा ते आपल्या हातापायाशीच खेळतांना दिसतं. पुढे पुढे वस्तू तोंडात घालायला लागतो. यातून विविध वस्तूंच्या स्पर्श , पोत आकार ,वास ,रंग हे अनुभवण्याची सुरूवात होत असते. एवढेच काय जगातील प्रत्येक वस्तू हे त्यांचा खेळ असू शकतो आणि ही क्रियाशीलता जेवढी वाढत जाईल, मुले हातांनी एवढ्या गोष्टी करतील, तितक्या त्यांच्या मेंदूच्या पेशी एकमेकांना जोडल्या जाऊन जाळं तयार होतं आणि त्यामुळे. त्यांची समज, आकलनशक्ती बुद्धी वाढत जाते. घराच्या पातळीवरून आता शाळेच्या पातळीवर बघितलं तर एक गोष्ट खूप छान आठवते.

एका मुलाच्या घर आणि शाळा याच्यामध्ये एक जंगल होतं. त्याला शाळेत जायला रोज उशीर व्हायचा .बाईंनी विचारलं की तो म्हणायचा मी तर खूप लवकर निघतो. शेवटी एकदा त्याच्या उशिरा येण्याचं कारण शोधायचं असं बाई ठरवतात आणि त्याच्याबरोबर घरी जायला निघतात. वाटेत तो दर मिनिटाला बाईना थांबवतो आणि त्या झाडावर टक टक केली की खारीची पिल्ले कशी दिसतात , या तळ्यात छोटा दगड फेकला की मासा कसा सुळकन उडी मारतो, या पानांचा ढीग डोक्यावर घेतला की, पानांचा पाऊस कसा पडतो, या झाडावर कशी पक्षांची पिल्ले राहतात आणि पक्षी त्यांना दाणे देतात, असा किती किती भरभरून आनंदाने आणि उत्साहाने तो दाखवतो. त्याच्या उशिरा येण्याचं कारण जेव्हा बाईंना कळतं तेव्हा त्या त्याला सांगतात,” तुला उशीर झाला तरी हरकत नाही ,पण तू असा रोज खेळत खेळत येतो तसाच येत जा.”शाळा, शिक्षक,आणि शिक्षण असावं तर असं ! याच पार्श्वभूमीवर मला तोत्तोच्यानची शाळा देखील आठवली, आणि तिची आई देखील !

जेन साही त्यांच्या “शिक्षण आणि शांती” या पुस्तकात उल्लेख केला आहे की ‘ स्कूल ‘हा शब्द मुळात स्कोल या ग्रीक शब्दापासून आलेला आहे .याचा अर्थ निवांतपणा किंवा मनाची ग्रहणशिल अशी अवस्था असा आहे. आणि अशा अवस्थेतच मुल जास्त चांगल्या पद्धतीने शिकू शकते. तसं म्हणाल तर आपल्याकडे मुल अग्रस्थानी राहील, अशी समाजामध्ये काय व्यवस्था आहे? मोकळ्या असलेल्या जागा मैदान म्हणून ठेवण्यापेक्षा,घरे, मॉल,दुकाने, अपार्टमेंट उभारून जागा वाया जाऊ नये एवढा फक्त बघितलं जातं. खरंतर मोकळ्या हवेत खेळण्याची संधी मुलांना देण्यासाठी खास मोकळी मैदानं राखून ठेवणं हे आपलं काम आहे.

त्याचप्रमाणे मुलांसाठी खास पुस्तकालयात किंवा ग्रंथालय. कमी उंचीच्या रॅकस मध्ये त्यांना सहज हाताळता येतील ,अशा पद्धतीने मांडलेली पुस्तक, जिथे कुठे त्यांना वाचायला घेऊन बसायचे असेल अशी जागा झाड, वेली इ. आणि मग घरी जावं असं वाटलं की लगेच आई-बाबा घ्यायला येणार असे दोनच तास तिथे त्यांच्यासाठी असावे. त्याउलट आपल्याकडे पाळणाघरांची परिस्थिती आहे, वाट पाहून दमलेल्या मुलांचे आई-वडील कामावरून घ्यायला खूप उशिरा येतात, पाळणा घरात पुरेशी जागा, पुरेशी स्वच्छता ,प्रशिक्षित काम करणारे या सगळ्याचा अभाव असतो.

त्याऐवजी लहान मुलांसाठी थिएटर्स, जिथे जगभरातले चांगले सिनीमे मुलांना बघता येतील ,मोठ्या मुलांसाठी सायन्स पार्क आणि लहान मुलांसाठी खेळघर आणि प्रशिक्षित कार्यकर्ते, त्यांना चित्र काढण्यासाठी मोठ्या भिंती, चित्रकलेचं सामान इ.हवे. या सगळ्याबरोबरच लहान मुलांची सुरक्षितता, म्हणजे त्यांची शारीरिक मानसिक भावनिक ,लैंगिक सुरक्षितता मिळेल असे वातावरण हवे. मुलांना दररोज एक तास मोकळ्या निसर्गाच्या वातावरणात शुद्ध हवा,शुध्द पाणी ,शुध्द माती यांचा अनुभव घेता यावा, म्हणजे मुलांप्रमाणे चालणारा बालकेंद्री समाज निर्माण होऊ शकेल. शांताबाई किर्लोस्कर पुढे म्हणतात त्या प्रमाणे ,

” विश्व सकल जागवा. शरीर बनो सुदृढ सबल , सदय मने हात कुशल.
ममतेच्या परिसरात निर्भय मन वाढवा, बालकास अग्रहक्क हाच मंत्र घोषवा.”

मानसी गिरीश फडके. ( संदर्भ : शोभा भागवत यांचा लेख २०१५)
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button