शरद पवारांच्या ‘त्या’ सभेची आज वर्षपूर्ती, राज्याच्या राजकारणाला मिळाली कलाटणी

Sharad pawar

सातारा : २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला (BJP-Shivsena) बहुमत मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा दाखवणाऱ्या दिवसाची आज (१८ ऑक्टोबर) वर्षपूर्ती होय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सातारा येथील भर पावसातील ‘ती’ सभा राज्यातील जनतेच्या मनात घर करून गेली. आणि विधानसभा निवडणुकीचे चित्रच बदलून गेले. सत्तेची थोडीही आशा नसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी जवळीक साधून महाआघाडी स्थापन करत राज्यात सत्ता स्थापन केली. म्हणूनच या दिवसाचे महत्व!

सातारा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडात एकेक बुरुज ढासळत चालला होता. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंना भाजपने आपल्या गळाला लावले होते. त्यामुळे हा किल्ला शाबूत ठेवण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार स्वत: रणांगणात उतरले. वर्षापूर्वी १८ ऑक्टोबरला सातारा जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या त्या ऐतिहासिक सभेने सर्वच राजकीय समीकरणे बदलून टाकली.

या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची मोठी सभा झाली होती. त्यामुळे शरद पवारांच्या सभेबद्दल उत्सुकता होती. पाटणमधील सभा उरकून पवारांनी साताऱ्यातील सभेच्या मैदानावर पाऊल ठेवताच पाऊस सुरू झाला. पण लोक जागचे हलले नाहीत. पवार बोलायला उभे राहिले आणि पावसाचा जोर वाढला. लोक समोर भिजत असल्याने पवारांनी डोक्यावरची छत्री बाजूला केली आणि धो-धो पावसाबरोबरच धीरगंभीर आवाजात शरद पवारही बरसू लागले. ‘मागच्यावेळी माझी चूक झाली, ती दुरुस्त करण्याचे काम सातारकरांनी करावे’, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आणि साताराच नव्हे तर, संपूर्ण राज्याचे राजकारण या सभेने बदलून टाकले. पवारांच्या या सभेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने या सभेच्या वर्षपूर्तीसाठी एका छोटेखानी सभेचे आयोजन केले आहे.

नरेंद्र मोदींच्या तुलनेत सभा कशी होणार हे पाहण्यासाठी विरोधकही आले आणि सर्वात मोठी सभा झाली. या सभेमुळे पुन्हा एकदा शरद पवारांचा करिष्मा सर्वांना पाहायला मिळाला, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी आजच्या वर्षपूर्तीनिमित्त दिली.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडी सरकारही त्यांच्या डोळ्यात खुपते, संजय राऊतांचा भाजपला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER