अण्णांचं सुदर्शनचक्र परवडणारं नाही…

Shailendra Paranjapeज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी गेल्या तीस वर्षात अनेक आंदोलने केली. पाणी अडवा पाणी जिरवा, ही मोहीम आपल्या स्वतःच्या गावात यशस्वीपणे राबवून राळेगणसिद्धी या आपल्या गावाला आदर्श गाव बनवलं. त्यामुळे आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी अण्णा हजारे यांना आंध्र प्रदेशमधे बोलावून त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं. अर्थात, अण्णा हजारे यांचा राळेगणसिद्धीचा पँटर्न महाराष्ट्रात अन्य गावांमधे होऊ शकला नाही आणि त्याचं मुख्य कारण हेच होतं की त्या गावांमधे बाकी सारं असलं तरी अण्णा हजारे नव्हते.

भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) पहिल्यांदा राज्यामध्ये सत्तेवर आले ते १९९५ मधे. त्यावेळी शिवसेना मोठा भाऊ असल्याने आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सारं काही ठरवत असल्याने शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्या काळात अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भ्रष्ट मंत्र्यांविरुद्ध अण्णांनी पुकारलेल्या आंदोलनातून शशिकांत सुतार असोत की बबनराव घोलप आणि सुरेशदादा जैन यांच्यासारखे मातब्बर मंत्री असोत, अण्णांनी काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातूनच नव्हे तर राजकारणातूनच संपवले, हा इतिहास आहे.

केवळ महाराष्ट्र पातळीवरच नव्हे तर अण्णांचा करिष्मा राष्ट्रीय पातळीवरही आहे. किंबहुना दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केवळ एक साधे माहिती अधिकार कार्यकर्ते होते, त्या काळात अण्णांनी नवी दिल्लीत येऊन केजरीवाल यांचे कौतुक केलेले आहे. त्यातूनच पुढे केजरीवाल यांनी अण्णांच्या सहकार्याने रामलीला मैदानावर आंदोलन करून देशाचं लक्ष वेधून घेतलं. त्यातूनच केजरीवाल यांचं नेतृत्व पुढे आलं. अर्थात, केजरीवाल सत्ताकारणात गेल्यामुळे अण्णांनी त्यांच्याशी असलेले संबंध पूर्वीसारखे ठेवलेले नाहीत.

अण्णा हजारे यांची सारी आंदोलने लक्षात घेतली तर अण्णांच्या प्रतिमेविषयी कोणालाच शंका असण्याचे कारण नाही पण त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाची पुढची फळी तितकीशी तयार झाली नाही आणि त्यामुळेच अण्णांना आजही या वयात अधूनमधून आपल्या आग्रहांसाठी, मागण्यांसाठी आंदोलनाचे अस्त्र उगारावे लागते. त्यातूनच अण्णांच्या दोन आठवडे चाललेल्या उपोषण आंदोलनाच्या वेळी त्यांच्यासमवेत राहून माजी पोलीस अधिकारी किरण बेदी असोत की माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग असोत, केजरीवालांचा कित्ता गिरवत या दोघांनीही राष्ट्रीय पातळीवर पदे मिळवली. सिंग केंद्रात मंत्री झाले तर बेदी राज्यपाल झाल्या. अण्णा पुन्हा एकदा आंदोलनासाठी एकटेच उरलेत.

केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि अण्णांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे गिरीश महाजन तसेच देवेन्द्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांची शिष्टाई निष्फळ ठरल्यानंतर थेट केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रात येऊन अण्णांशी चर्चा केली. त्यामुळे अण्णांनी आपलं आंदोलन सहा महिन्यांसाठी स्थगित केले आहे. नेमकी हीच गोष्ट सिवसेनेला लागलेली दिसते. त्यातूनच मग शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून अण्णांवर टीका करण्यात आलीय. या टीकेला उत्तर देताना अण्णांनी शिवसेनेला १९९५ ते १९९९ या काळाची आठवण करून दिलीय. तुमचे मंत्री घरी पाठवलेत त्याची आठवण आहे ना, असं आव्हानंच अण्णांनी दिलंय.

मुळात अण्णा आणि केंद्र सरकार काय करायचं ते करतील. फडणवीस महाजन विखेपाटील यांची धावपळ होतेय तर होऊ दे. पण अण्णांवर टीका करून शिवसेना आणि राज्यातलं सरकार एक प्रकारे आग्या मोहोळावरच दगड भिरकावतंय. अण्णांचं सुदर्शनचक्र निघालं तर पळता भुई होते, हा अनुभव घेऊनही शिवसेना त्यांच्यावर टीका करणार असेल तर ते राजकीयदृष्ट्या फार शहाणपणाचं ठरणारं नाही.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER