अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याची आघाडी सरकारवर नामुष्की

अण्णाभाऊ साठे स्मारक समिती

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिम्मित राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्या जात आहे. मात्र, दुसरीकडे अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार करण्यासाठी बनविण्यात आलेल्या समितीच्या कार्यालयाला दुसऱ्यांदा भाडे न भरल्याने जागा मालकाने टाळे ठोकल्याची नामुष्की महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर ओढवली आहे. तर अडीच वर्ष इथल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पगारही देण्यात आला नसल्याची माहितीही उघड झाली आहे.

गोवंडी येथील अर्जुन सेंटरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ भाऊ साठे स्मारक समितीचे कार्यालय आहे. या कार्यालयात पूर्वी अधिकारी ते कर्मचारी असे १९ जण काम करीत होते. त्यांची नियुक्ती शासकीय नियमानुसार करण्यात आली होती. घाटकोपर येथील अण्णाभाऊ यांच्या घराच्याजागी उभे करण्यात येणाऱ्या स्मारकाचा निर्मितीबाबतचे सर्व कार्य इथून चालते. मात्र, जेव्हापासून हे कार्यालय सुरु झाले तेव्हापासून येथील कर्मचारी आणि या कार्यालयाकडे सरकार आणि संबंधित शासनाने दुर्लक्ष केले आहे. इथल्या १९ कामगारांना पगार न मिळाल्याने त्यांना वारंवार आंदोलने करावी लागली होती. तर या कार्यालयाचे भाडे न भरल्याने या अगोदर देखील या कार्यालयाला टाळे ठोकण्याची नामुष्की ओढवली होती. तेव्हा सरकार वर जोरदार टीका झाल्यावर शासनाने हे भाडे भरले. मात्र, कामगारांना पगार मात्र मिळालाच नाही. तर आता पुन्हा हीच स्थिती ओढवली असल्याने कर्मचारी आणि अण्णाभाऊ साठे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दहा महिने या कार्यालयाचे भाडे न भरल्याने मालकाने पुन्हा या कार्यालयाला नोटीस देऊन टाळे ठोकले आहे. शासनातर्फे कधीच वेळेत भाडे न मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर याबाबत सर्व सबंधीत मंत्री, अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याचे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्ष असताना अश्या प्रकारे त्यांच्या स्मारक समितीवर टाळे बंदीची नामुष्की आली असून यात सरकार काय पावले उचलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER