अंकुशचे लक डाउन लवकरच

Ankush Chaudary

लॉक डाऊन या शब्दाने गेल्या सात-आठ महिन्यांपासून आपण लढत असलेल्या कोरोना काळात प्रत्येकाच्याच आयुष्याला एक वेगळा अर्थ दिला आहे. कोणताही माणूस सुट्टी मिळावी आनंदात नक्कीच असतो, पण कुठलंही काम हातात नसताना, हातातलं काम जिथल्या तिथे थांबलेले असताना लॉक डाऊन मध्ये घरात बसून होता. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर वेगवेगळ्या संधी खुल्या होत आहेत. अभिनेता अंकुश चौधरीच्या चाहत्यांनाही त्याला पडद्यावर पाहण्याची ट्रीट मिळणार आहे. लक डाउन या नावाचा सिनेमा अंकुश करत असून यामध्ये तो अभिनेत्री प्राजक्ता माळी सोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करतोय.

सिनेमातील हिरो साठी लागणारी तगडी उंची, देखणा चेहरा,डॅशिंग लूक, डान्स आणि अर्थातच अभिनय या सगळ्या गोष्टीची भट्टी जमलेला अभिनेता अंकुश चौधरीने त्याचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. विनोदी सिनेमातल्या जातकुलीतले सिनेमे थोडेसे मागे पडल्यानंतर मराठी पडद्यावर ॲक्शन पट सिनेमे यायला लागले तेव्हा अंकुश चौधरी हा क्लिक झाला. क्लासमेट असो, दुनियादारी असो की मग डबल सीट, गुरु, दगडी चाळ यासारख्या सिनेमातून अंकुशने त्याच्या अभिनयातील वैविध्य देखील पडद्यावर दाखवून दिले आहे. एकांकिका, प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक असा अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या अंकुशने मराठी सिनेमात स्वतःचे एक वेगळे स्थान देखील कमावले आहे. डबल सीट या सिनेमा मध्ये त्याची मुक्ता बर्वे सोबत चांगलीच केमिस्ट्री जमली होती. मधल्या काळात अंकुश मोठ्या पडद्यावरून गायब झाला होता.

मात्र त्याचे वेगवेगळे प्रयोग सुरू होते. पुन्हा एकदा त्याला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे त्याच्या या नव्या सिनेमाचं नाव आहे लक डाउन. या शब्दाचा अर्थ बघायचा झाला तर नशिबाचा आलेख खाली येणे. सध्यातरी या सिनेमाची कथा नेमकी काय आहे ही उत्सुकता गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. यातच लॉकडाउन काळात या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली होती आणि आता लॉक डाऊन नंतर या सिनेमाच्या चित्रीकरणाला प्रारंभ झाला आहे.

प्राजक्ता माळी देखील …आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर या सिनेमातील एका छोट्याशा भूमिकेनंतर मोठ्या पडद्यावर अंकुश सोबत झळकणार आहे . अंकुश सांगतो की, मी नेहमीच भूमिकेची निवड करत असताना त्यातले वेगळेपण शोधत असतो. शिवाय मला सामान्य माणसाच्या जगण्याशी जोडली जाणारी भूमिका करायला खूप आवडतं. त्यामुळे अभिनयात देखील एक नैसर्गिक पण येतो असं माझं स्वतःचं मत आहे. आतापर्यंत मी केलेल्या भूमिका या जरी पडद्यावरचा हिरो म्हणून माझं काम असले तरी त्यातून एक फ्लेवर हा समाजातील प्रत्येकाच्या जगण्याचा भाग असेल याच्यासाठी माझे प्रयत्न सुरू असतात. लकडाउन या सिनेमामध्येही माझी भूमिका अशीच असेल. प्राजक्ता माळी सोबत पहिल्यांदाच करत असल्याने त्याची ही वेगळी उत्सुकता आहे.

सध्या प्राजक्ता सिनेमापेक्षा मालिका आणि वेगवेगळ्या शोचे निवेदन करताना दिसत आहे. मात्र या नव्या सिनेमामुळे ती देखील बर्‍याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अंकुश चौधरी, केदार शिंदे आणि भरत जाधव हे त्रिकूट गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयाच्या क्षेत्रांमध्ये नवनवे प्रयोग करत असतं. या तिघांचीही सुरुवात कॉलेज जीवनातील एकांकिका स्पर्धांमधून झाली. एके काळी भाजी विक्री करून अंकुश चौधरी याने त्याच्या अभिनयाची हौस भागवली आहे. मुंबईतच अंकुशचे बालपण गेल्यामुळे त्याला अभिनय क्षेत्रातील संधी एकेक पायरीने खुल्या होत गेल्या.

मात्र अत्यंत कष्टाने त्याने आतापर्यंतचे हे स्थान मिळवले आहे. अंकुशला हलक्या-फुलक्या भूमिका करायला आवडतात तितक्याच संवेदनशील भूमिकामध्ये ही अंकुश भाव खाऊन जातो. दुनियादारी सारख्या सिनेमात त्याने कॅमेऱ्यासमोर बोललेले अनेक संवाद हे त्याच्यातील या संवेदनशील अभिनयमुळेच प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचले. कोणताही नेपथ्याचा डामडौल नसलेल्या प्रायोगिक नाटकातून अंकुश च्या कारकीर्दीची सुरुवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER