हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजयी

Ankita Patil

इंदापूर: काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद जागेवरुन त्या 17 हजारांहून अधिक मतांनी निवडून आल्या आहेत.

अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच सक्रीय राजकारणात प्रवेश केला आणि पहिल्याच टर्ममध्ये यशस्वीदेखील झाली आहे.

पाटील कुटुंबात माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांच्यानंतर त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या कन्येच्या प्रवेशामुळे पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात दाखल झाली होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंसाठी धावपळ करणाऱ्या अंकिता पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीनेही जाहीर पाठींबा दिला होता.

हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनानंतर बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अंकिता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. 23 जून रोजी बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.