इंदोरीकर महाराजांवर कारवाई न केल्याने जिल्हा शल्यचिकित्सकाला अंनिसची नोटीस

Indorikar Maharaj

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध कारवाई न केल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य समन्वयक रंजना गावंडे यांनी नोटीस बजावली आहे. इंदोरीकर महाराजांवर १५ दिवसांत कारवाई न केल्यास त्यांच्याविरोधत न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे रंजना गावंडे यांनी म्हटले आहे.

इंदोरीकर महाराज अर्थात  निवृत्ती देशमुख यांनी केलेल्या सम-विषम तारखेच्या वादग्रस्त वक्तव्यावरून ते चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यांच्याविरुद्ध अनेक संघटनांनी आंदोलन केले होते. गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदानतंत्र प्रतिबंध समितीने (पीसीपीएनडीटी) इंदोरीकर महाराज यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर महाराज म्हणाले होते की, ‘मी ते वाक्य बोललोच नाही. मी असे कीर्तन केलेच नाही, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यात कीर्तन केलंच नाही.

मराठी भाषादिनानिमित्त विचारांसह ठाकरे, फडणवीस,पवार,थोरात यांची मनही जुळले!

यू-ट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंगदेखील करत नाही. ’ जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर म्हणाले, इंदोरीकर यांनी जी उत्तरे दिली आहेत  तसे नसेल तर उत्तर समाधानकारक आहे. मात्र, ज्या वर्तमानपत्रात हे छापून आले त्यांनी उत्तर अजून दिले नाही, त्यांनी पुरावे द्यावे. जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही.

तक्रार देऊनही तक्रारीला कुठलेही उत्तर दिले नसल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक आणि कमिटी अध्यक्ष प्रदीप मुरंबीकर यांना अंनिसच्या समन्वयक रंजना गावंडे यांनी नोटीस दिली आहे. १५ दिवसांत कारवाई न केल्यास दोघांच्याही विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करणार असल्याचे रंजना गावंडे यांनी म्हटले आहे. पीसीपीएनडीटीने पुरावे नसल्याचे सांगत तूर्तास इंदोरीकर महाराज यांना दिलासा दिला होता. मात्र अंनिसच्या भूमिकेमुळे इंदोरीकर महाराजांच्या  अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.