अनिल परब हे बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक, ते खोटी शपथ घेऊ शकत नाही – संजय राऊत

Maharashtra Today

मुंबई :- परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी टाकलेल्या लेटर बॉम्ब पाठोपाठ आता सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही वसुली करायला लावल्याचे गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेंच्या या आरोपांना आता स्वत: अनिल परब (Anil Parab) यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. मी माझ्या दोन मुली आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे सर्व खोटं आहे. हे मला नाहक बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात आले, असे म्हणत त्यांनी आरोप फेटाळून लावले. मात्र विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आणि यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.

मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. अनेक डाव आखले जात आहे. सचिन वाझेने एनआयएच्या कार्यालयात पत्र लिहलेले आहेत. हल्ली कैद्यांकडून जेलमध्येही असे पत्र लिहले जातात. मात्र कितीही प्रयत्न होऊन जाऊ दे. शरद पवारांची (Sharad Pawar) साथ असेपर्यंत ‘ठाकरे’ सरकार स्थिर आहे. कितीही संकटे आली तरी आम्ही परतवून लावू, खोटे पर्वत भेदून आम्ही पुढे जाऊ. कितीही प्रयत्न करा आमचे सरकार स्थिर राहणार, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहेत. एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे ज्यामध्ये जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचं आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. असं असेल तर जेलमध्ये अजूनही अनेक लोक आहेत. त्यांच्याकडूनही खूप काही लिहून घेतलं जाऊ शकतं. या प्रकारचं घाणेरडं राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही,” असं संजय राऊत बोलले आहेत.

अनिल परब यांच्यावर झालेल्या आरोपावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अनिल परब यांचं नाव आलं आहे. अजित पवार, अनिल देशमुख यांचं नाव आलं आहे. गुन्हा केल्याने अटकेत असलेल्या आरोपीकडून जेलमध्ये लिहून घेतलं जातं आणि तो पुरावा म्हणून समोर आणलं जातं. हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना ओळखतो. अशा कामांत ते कधीच नसतात. अनिल परब बाळासाहेबांच्या छत्रछायेत वाढले आहे. ते बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहेत. ते बाळासाहेबांची शपथ घेऊन खोटे बोलूच शकत नाही. त्यांच्या या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. या आरोपातून ते नक्कीच बाहेर पडतील, असा दावाही राऊत यांनी केला.

राष्ट्रीय तपास यंत्रणा आपण ज्यांना म्हणतोय त्यांच्यासाठी विरोधी पक्ष गालीचे अंथरत आहे हे या आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या सरकारला जर कोणी अशा प्रकारे कोंडीत पकडून अस्थिर करण्याचे डावपेच करत असतील तर यशस्वी होणार नाही. काल एका पत्रलेखकाचं पत्र आलं, एनआयएच्या हाती पत्र आहे. हे पत्रलेखक एनआयच्या ताब्यात आहेत. एखाद्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी इतक्या यंत्रणा वापरल्या जात आहेत. त्या पत्राची सत्यता कोणी सांगू शकत नाही. ते पत्र लिहिणारा व्यक्ती किती प्रतिष्ठित किंवा संत महात्मे आहेत याविषयी विरोधी पक्षाने एकदा स्पष्ट करावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

ही बातमी पण वाचा : “आरारा… काय वेळ आली यांच्यावर’, बाळासाहेबांची शपथ घेणाऱ्या अनिल परबांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button