दुसऱ्यांनी नाकारलेले सिनेमे करून हिट झाला अनिल कपूर

Anil Kapoor

गेल्या चार दशकांपासून अनिल कपूर रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आला आहे. अमिताभ बच्चनप्रमाणेच अँग्री यंग मॅन ते कॉमेडी अशा सर्व प्रकारच्या भूमिका अनिल कपूरने (Anil Kapoor) या चार दशकात साकारलेल्या आहेत. 90 च्या दशकात अनिल कपूरने सलग 14-15 हिट सिनेमे दिले होते. परवा म्हणजे 24 डिसेंबरला अनिल कपूरचा वाढदिवस आहे. वयाच्या 64 व्या वर्षीही अनिल कपूर कार्यरत असून त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा नवा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. या चार दशकात अनिल कपूरने अनेक हिट सिनेमे दिले. मात्र यापैकी अनेक सिनेमे दुसऱ्या कलाकारांनी नाकारल्याने मला मिळाले होते असे अनिल कपूरने सांगितले. तसेच काम मागायला मला काहीही लाज वाटत नाही असेही अनिल कपूरने सांगितले.

पहिला सिनेमा ‘ईश्वर’ कसा मिळाला याबाबत बोलताना अनिल कपूरने सांगितले, 1977 मध्ये मी सर्वप्रथम कॅमेरा फेस केला तो एका तेलुगु सिनेमासाठी. प्रख्यात दिग्दर्शक के. विश्वनाथ ‘ईश्वर’ नावाचा सिनेमा बनवत असल्याचे माझ्या कानावर आले होते. यासाठी नायक म्हणून ते कमल हसनला घेणार होते. ते मुंबईतील एका हॉटेलमध्ये आले असता मी त्यांना जाऊन भेटलो आणि काम देण्याची विनंती केली. या सिनेमाची निर्मिती राज कपूर करीत होते. त्यानंतर एकदा राज कपूर आमच्या घरी जेवायला आले होते तेव्हा मी त्यांना पकडूनच ठेवले आणि काम मागितले. तेव्हा ते म्हणाले, कमल हसनने नकार दिला तर मी तुला घेईन. नंतर कमल हसनने सिनेमा करण्यास नकार दिला आणि ‘ईश्वर’ मला मिळाला. केवळ पहिलाच सिनेमा नव्हे तर माझे अनेक हिट सिनेमे हे दुसऱ्यांनी सोडल्यानंतरच मला मिळाले आहेत असेही अनिल म्हणाला.

अनिल कपूरने पुढे त्याच्या दुसऱ्या सिनेमांबाबत माहिती दिली. अनिल म्हणाला, माझा ‘नायक’ सिनेमा खूप हिट आणि चर्चेत होता. मात्र निर्माते या सिनेमात हीरोच्या भूमिकेसाठी आमिर किंवा शाहरुखला घ्यायचा विचार करीत होते. दोघांनीही जेव्हा सिनेमा करण्यास नकार दिला तेव्हा तो सिनेमा मला मिळाला. प्रेक्षकांना माझी यातील भूमिका खूप आवडली.

हॉलिवुडचा प्रख्यात दिग्दर्शक डॅनी बॉयल जेव्हा ‘स्लमडॉग मिलिनियर’ बनवत होता तेव्हा त्यात तो दुसऱ्या अभिनेत्याला घेण्याचा विचार करीत होता. त्या अभिनेत्याबरोबर त्याचे बोलणेही झाले होते. परंतु काही कारणास्तव त्या अभिनेत्याने नकार दिला आणि तो सिनेमा मला मिळाला. या सिनेमाने ऑस्करही मिळवला. माझे नशीब हे असे चांगले आहे असेही अनिल म्हणाला.

अनिल कपूरचा आणखी एक सुपरहिट सिनेमा म्हणजे ‘मिस्टर इंडिया’. अनिल कपूरच्या कारकिर्दीतील हा एक अत्यंत महत्वाचा सिनेमा. शेखर कपूर द्वारा दिग्दर्शित या सिनेमात अगोदर नायकाची भूमिका साकारण्यासाठी अमिताभ बच्चन यांना घेण्याचा विचार सुरु होता. परंतु काही कारणाने अमिताभ यांनी नकार दिला आणि सिनेमा अनिलच्या खिशात आला. अनिल कपूरचे या सिनेमातील काम आणि एकूणच सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडला होता. आजही हा सिनेमा प्रेक्षक आवडीने बघतात.

अनिल कपूरने आयुष्यात प्रथमच एखाद्या भूमिकेसाठी मिशा काढून टाकल्या त्या यश चोप्रा यांच्या ‘लम्हे’ सिनेमासाठी. मात्र यश चोप्रा यांनी जेव्हा लम्हेची सुरुवात केली तेव्हा यात अमिताभ बच्चन आणि रेखाला घेण्याचा विचार केला होता. परंतु ही यंग लव स्टोरी असल्याने त्यांनी आपला निर्णय बदलला. अमिताभऐवजी दुसऱ्या नायकाचा शोध त्यांनी सुरु केला. तेव्हा लेखिका हनी ईराणीने ने यश चोप्रा यांना अनिल कपूरचे फोटो दाखवले आणि एक न्यूकमर तुमच्याबरोबर काम करू इच्छितो असे सांगितले. यश चोप्रा यांनी फोटो बघितले आणि ते चकित झाले कारण तोपर्यंत अनिल कपूर स्टार झालेला होता. अनिल कपूरशी त्यांनी बोलणी केली आणि त्याला भूमिकेसाठी मिशा काढून टाकाव्या लागतील असे सांगितले. अनिल लगेच तयार झाला. त्यानंतर ‘लम्हे’ तयार झाला.

दिग्दर्शक अनुराग कश्यप जेव्हा रणबीर कपूरला घेऊन ‘बॉम्बे वेल्वेट’ बनवत होता तेव्हा त्यातील खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी धी मिळाली म्हणून अनिल कपूरने त्याच्याशी संपर्क साधला होता. पण अनुरागने तेव्हा ती भूमिका करण जोहरला दिली होती. मात्र आता अनुराग कश्यप आणि अनिल कपूर एके व्हर्सेस एके सिनेमा करीत आहे.

ही बातमी पण वाचा : जेव्हा गोविंदाला आपला बंगला सोडून विरारमध्ये राहणे भाग पडले… ताज हॉटेलनेही…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER