शिधावाटप दुकानात जीवनाश्यक वस्तुचा तुटवडा, अनिल गलगली यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे. लॉक डाऊनवेळी लोकांना जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही कमतरता भासू नये म्हणून राज्य सरकारतर्फे शिधापत्रक धारकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या दुकानात केवळ गहूच उपलब्ध असल्याचा गौप्यस्फोट माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

गलगली यांनी याबाबतची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. संचारबंदी असूनही मुंबईतील सर्व शिधावाटप दुकानात केवळ गहू उपलब्ध आहे. तांदूळ, पामतेल, साखर आणि डाळ केव्हा उपलब्ध होईल? असा सवाल आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

सध्या राज्यात लॉकडाउन आहे. आज शिधावाटप दुकानात केवळ गहू उपलब्ध आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. धान्य उचल करणारी यंत्रणा नसल्यामुळे सरकारी अधिकारी हतबल आहेत. त्यामुळे शिधावाटप दुकानात जीवनाश्यक वस्तुचा तुटवडा असून तो दूर करावा आणि सामान्यांना जीवनाश्यक वस्तुंचे वितरण करावे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याकडे केली आहे.