‘सीबीआय’च्या ‘एफआयआर’विरुद्ध अनिल देशमुखांची हाय कोर्टात याचिका

Anil Deshmukh - Bombay High Court - Maharashtra Today
Anil Deshmukh - Bombay High Court - Maharashtra Today

मुंबई : भ्रष्टाचार व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे या गुन्ह्यांसाठी केंद्रीय गुप्तचर विभागाने (CBI) आपल्याविरुद्ध नोंदविलेला ‘एफआयआर’ रद्द (FIR) करून घेण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अ‍ॅड. सोनाली जाधव या वकिलामार्फत देशमुख यांनी ही याचिका केली असून याचिकेचा निकाल होईपर्यंत अटकेपासून संरक्षणाचा अंतरिम आदेश देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. याचिकेवर याच आठवड्यात तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात येईल, असे कळते.

देशमुख यांनी गृहमंत्री असताना आपल्या मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांना बंगल्यावर बोलावून त्यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचे हप्तेवसुलीचे ‘टार्गेट’ ठरवून दिले. तसेच ते महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासांत व पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करतात, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून केला होता. या आरोपांची ‘सीबीआय’ने प्राथमिक चौकशी करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सीबीआय’ने स्वत: देशमुख व इतरांचे जाब जबाब नोंदवून चौकशी केली व त्यातून गुन्हे घडल्याचे दिसून आल्याने देशमुख व अन्य काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम १२० बी (गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे) आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये (लोकसेवकाने लाच घेणे) ‘एफआयआर’ नोंदविला.

तपासातून गुन्हा नोंदविण्यासारखी कोणतीही प्रथमदर्शनी माहिती समोर आलेली नसूनही गुन्हा नोंदविण्यात आल्याने तो रद्द करावा यासाठी देशमुख यांनी याचिका केली आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button