अनिल देशमुखांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार, शरद पवारांच्या भेटीनंतर चर्चा

Anil Deshmukh-Sharad Pawar

नवी दिल्ली :- आज अचानकपणे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी थेट दिल्ली गाठून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. आज सकाळी मी दिल्लीत आलो होतो. विदर्भात, नागपुरात मिहान प्रकल्प सुरु आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या इंडस्ट्रींचा येण्याचा विचार आहे. त्यामुळे आमच्या विदर्भात या इंडस्ट्री आल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेबांची मदत घेण्यासाठी मी आलो होतो. पवार साहेबांना मिहान प्रकल्पाचे डिटेल्स दिले. त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा करत असताना, पवार साहेबांनी साहजिकच मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची माहिती घेतली, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. मात्र गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही.

मात्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या बदलीनंतर आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पदावरच टांगती तलवार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन हटवण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर मोठमोठे खुलासे होत आहेत. त्यामुळे गृहखातं बदनाम होत असल्याची भावना आहे. त्यामुळेच अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावर हटवण्याची शक्यता आहे.

एकीकडे अनिल देशमुख नागपुरातील मिहान प्रकल्पाबाबत सांगत असले तरी, खुद्द शरद पवारांच्या भेटीसाठी ते दिल्लीत पोहोचले, यावरुन सध्याच्या राजकीय घडामोडींचा अंदाज येऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुखांच्या गृहखात्याच्या कारभारावर शरद पवार नाराज आहेत. अनिल देशमुखांचा खात्यावर वचक नाही, ते गृहखातं हाताळू शकत नाहीत, अशी भावना आहे. त्यामुळे शरद पवारांनी अनिल देशमुखांना दिल्लीत पाचारण केल्याचं सांगण्यात येत आहेत.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यूप्रकरणात ठाकरे सरकार बॅकफूटवर असलं तरी गृहखातं बदनामीच्या केंद्रस्थानी आहे. सचिन वाझे यांना शिवसेना वाचवत असल्याचा आरोप होत आहे. मात्र गृहखातं हे राष्ट्रवादीकडे असल्याने या खात्याकडेही बोट दाखवलं जात आहे.

सचिन वाझे यांचं नाव स्फोटक प्रकरणात आल्याने, गृहखात्यावर अनिल देशमुख यांचा वचक नसल्याची भावना शरद पवारांची आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे. हे पहिलं कारण आहे, ज्यामुळे अनिल देशमुखांवर टांगती तलवार आहे. दुसरं म्हणजे मुंबई पोलीस, सचिन वाझे याप्रकरणात गृहखातं बदनाम झालं आहे. त्याशिवाय तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे अनिल देशमुख यांचं मनोधैर्य खचल्याचं दिसत असल्याने, मुख्यमंत्रिपदानंतर सर्वात महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या खात्याचा कारभार, त्यांच्याकडे देणं योग्य नाही, त्यामुळे त्यांना हटवून गृहखात्याचा अनुभव असलेल्या जयंत पाटील यांच्या हे खातं सोपवलं जाऊ शकतं.

ही बातमी पण वाचा : रोहित पवार प्रवीण दरेकरांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER