अनिल देशमुखांची महिन्याला १०० कोटींची मागणी, वसुलीचे काम वाझेकडे; परमबीर सिंग यांचा आरोप

Anil Deshmukh-Parambir Singh

मुंबई :- मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त पदावरून उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.

परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे.

हॉटेल, बारकडून वसुलीचे टार्गेट

अनिल देशमुख यांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर आस्थापनांकडून असे मिळून १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असं या पत्रात म्हटलं आहे. प्रत्येक महिन्याला ही वसुली करण्याचं वाझेंना टार्गेट देण्यात आलं होतं, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

काय म्हणाले परमबीर सिंह?

परमबीर सिंह म्हणतात, मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्या वेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती, असं माझ्या लक्षात आलं. सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचे  युनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दरमहिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं.

फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकीय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्या वेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक-दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढंच नाही तर १०० कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १,७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर सोर्सेसकडून जमा करता येईल. त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले. आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं.

मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो. दरम्यान, वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडे होमगार्डची जबाबदारी देण्यात आली होती. डीजी रँकमध्ये हे शेवटच्या दर्जाचे पद असल्याने एक प्रकारची शिक्षा केल्यासारखीच राज्य सरकारने सिंह यांना वागणूक दिली होती. त्यामुळे सिंह नाराज होते. अपराध केल्यासारखी ही वागणूक असल्यामुळे सिंह नाराज असल्यानेच त्यांनी देशमुख-वाझे नेक्ससचा पर्दाफाश केला असावा, असं बोललं जात आहे. दरम्यान, परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेल्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली असून, सरकारला आणखी कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना आता नवा मुद्दा मिळाला आहे.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER