गृह खाते अनिल देशमुख चालवितात की अनिल परब? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Devendra Fadnavis - Anil Deshmukh - Anil Parab - Uddhav Thackeray - Maharashtra Today

नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि विद्यमान होमगार्ड महासंचालक परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठवलेल्या पत्रानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

परमबीर सिंग यांनी पाठविलेले हे काही पहिले पत्र नाही. रश्मी शुक्ला यांच्या तपासानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल (Subodh Jaiswal) यांनी जो अहवाल सरकारकडे सादर केला, त्याची माहिती जनतेला द्या, म्हणजे संपूर्ण प्रकार उघडकीस येईल, असा नवा आरोप फडणवीस यांनी केला.

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर झालेले गंभीर आरोप, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांचे पत्र याबाबत आज त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, परमबीर सिंग यांनी काल एक पत्र लिहिले आहे. पण, अशा प्रकारचे हे पहिले पत्र नाही. यापूर्वी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता आणि त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. मुळात सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलीस महासंचालकासारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे काहीच कारण नव्हते; पण, रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालावर हे सरकार कोणतीही कारवाई करू इच्छित नव्हते आणि नेमक्या त्या दूरध्वनी संवादातीलच नावे बदल्यांच्या फाईलमध्ये आलेली होती. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्याबाबत शासन अजिबात गंभीर नव्हते. त्यामुळे एकेक करीत वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेले.

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशांच्या अधीन राहून काही फोन पोलिसांकडून सर्व्हिलन्सवर होते. त्यातून जितके गंभीर प्रकार पुढे आले, ते फारच स्फोटक आहेत. बदल्यांचे एक मोठे रॅकेट आढळून आले. ही दलाली आणि लाचखोरी तेव्हाच थांबविली गेली असती, तर आज हा प्रसंग आला नसता. माझ्या माहितीप्रमाणे या दलालीचा संपूर्ण रिपोर्ट सरकारच्या रेकॉर्डवर ‘इनवर्ड’ झालेला आहे, असाही दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेतील कमिटीने वाझे यांना नोकरीत घेतले, असे शरद पवार सांगत असले तरी मुख्यमंत्र्यांच्या तसेच गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला मात्र पवार विसरले. परमबीर सिंग यांच्या पत्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना माहिती दिल्याचे (ब्रिफिंग) सांगितले आहे. मग या प्रकरणी मुख्यमंत्री का बोलत नाहीत? ते का गप्प आहेत? असे करून परमबीर सिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल तर ते पापांवर पांघरूण घालण्यासारखे आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. खरे तर गृह खाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब (Anil Parab), हाच प्रश्न निर्माण झाला आहे; कारण सभागृहात गृह विभागावर उत्तरं अनिल परब देतात. त्यामुळे या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट आता झालेच पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सचिन वाझे (Sachin Vaze) जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या गेल्या पाच ते सहा महिन्यांत नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे, अशी मागणी करून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे ज्युलिओ रिबेरो हे निश्चितच अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत; पण त्यांनी सुचविल्याप्रमाणे ते केवळ परमबीर सिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांचीसुद्धा? थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी १५-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलीस अधिकार्‍यांनी करावी, असे शरद पवार यांना सुचवायचे आहे का? अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. याची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीत झाली पाहिजे. त्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER