
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी व्हावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी सीबीआयची चौकशी टाळण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. अनिल देशमुख यांच्याकडून सीबीआय चौकशीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी सोमवारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तातडीने ते दिल्लीसाठी रवाना झाले. याठिकाणी देशमुखांनी काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. अनिल देशमुख, अभिषेक मनु सिंघवी आणि वकिलांमध्ये तासभर चर्चा सुरू होती. यानंतर अनिल देशमुख सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे सांगितले जाते.
उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या पत्रासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर सीबीआयचे हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. न्यायालयाने सीबीआयला अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे सीबीआयची टीम आजच मुंबईत दाखल होईल. त्यानंतर सीबीआयच्या टीमकडून सर्वप्रथम परमबीर सिंह यांना चौकशीला बोलावले जाण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांनी यापूर्वीच पुरावे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सिंग सीबीआयकडे अनिल देशमुखांविरुद्ध कोणती माहीती देणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला