‘त्या’ पत्रकार परिषदेवर अनिल देशमुखांनी दिले स्पष्टीकरण …

Anil Deshmukh - Maharastra Today

मुंबई :- परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आज सकाळपासून राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचा वाद सुरू झाला. सकाळी शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत “परमबीर सिंग यांनी उल्लेख केलेल्या दिवसात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते”, अशी पाठराखण केल्यानंतर विरोधी पक्ष भाजपाकडून अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचे ट्विट रीट्विट करत शरद पवारांनाच (Sharad Pawar) प्रश्न केला. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा केला.

खुलासा

१५ फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हीडीओ विरोधकांकडून ट्वीट केले जात असताना अनिल देशमुखांनी ती पत्रकार परिषद रुग्णालयाबाहेरच घेतली होती, असे सांगितले. ते वम्हणालेत, “कोविड झाल्यामुळे मी ५ ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज झाला. मी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना गेटवर काही पत्रकार होते. त्यावेळी माझ्या अंगात त्राण नव्हता. मी हॉस्पिटलमध्येच खुर्चीवर बसलो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर घरी जाऊन ‘होम क्वारंटाईन’ झालो. १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाईन होतो. २८ फेब्रुवारीला पहिल्यांदा बाहेर पडत सह्याद्री गेस्टहाऊसला मीटिंगला गेलो”.

आक्षेप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात फेब्रुवारीच्या मध्यात सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी बोलावून पैसे वसुलीचे टार्गेट दिल्याची माहिती काही पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, या काळात अनिल देशमुख करोनाच्या उपचारांसाठी रुग्णालयात होते, असा खुलासा शरद पवारांनी केला.

यानंतर विरोधकांनी अनिल देशमुख यांनी १५ तारखेलाच घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हिडीओ पोस्ट करत जाब विचारायला सुरुवात केली. यामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा देखील समावेश आहे. त्यावर अनिल देशमुखांकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER